६२ ग्रामपंचायतीत आक्रोश
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : घरी टीव्ही, फ्रीज, दुचाकी, चारचाकी, शेती असल्याची माहिती जनगणना सर्वेक्षणाच्या वेळ दिली. कुटुंबप्रमुखांनी सांगितलेली माहिती आता तब्बल दोन हजार लाभार्थींना महागात पडणार असून ‘ड’ यादीतील ही घरकुले रद्द होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान ६२ ग्रामपंचायतींमधील लाभधारकांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
शासनाने सन २०११ मध्ये जनगणनेत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले होते. यावेळी घरी असलेली संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. यावरून बीपीएलधारक, कुटुंबाकडे पक्के घर, मातीचे घर, टीव्ही, फ्रीज, टेलीफोन मोबाईल, दुचाकी, चारचाकी अशा १३ निकषांची माहिती गोळा करण्यात आली होती. पंचायत समितीने सदर गोळा केलेली माहिती शासनाकडे पाठवली होती. ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षणातून ‘अ’ यादी तयार करण्यात आली. त्यानंतर यातूनच ‘ब’ व ‘ड’ अशा दोन प्रकारच्या याद्यांची निवड ग्रामसभेतून करण्यात आली.
दोन हजार लाभार्थींना फटका
तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीमध्ये ‘ब’ घरकुल धारकांची यादी पूर्णत्वाकडे आली आहे. आता ‘ड’ यादीतील लाभार्थींना अनुक्रमे घर मिळायला सुरुवात होणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केलेल्या यादीचे संगणकावर फिल्टर केले. त्यावेळी तालुक्यातील ४ हजार ६४७ लाभधारकांचे आधार कार्ड लिंक झाले नव्हते, तर ८ हजार ६० लाभधारकांनी जॉब कार्ड मॅपिंग केले नाही. २ हजार ५४ लाभार्थींकडे टीव्ही, फ्रीज तसेच पक्के घर असल्याची माहिती पुढे आली आहे.
सरपंच, उपसरपंच बनले आक्रमक
तालुक्यातील सरपंच मंगेश बोबडे, सोनू बोधले, मनोज शिवणकर, विजेंद्र दरवळकर, विश्वेश्वर दिघाडे, माधुरी पंचबुद्धे, स्नेहल कडू, संगीता धोटे, मनीषा रोकडे, छाया गायकवाड, अवधूत दिवे, सत्यभामा कांबळे, ममता राठी, सतीश हजारे, प्रीती पचारे, ज्योत्स्ना निसार, कांचन झेले, रूपेश गुल्हाने, संदीप इंगळे, दुर्गाबक्षसिंह ठाकूर, राजू नेवारे, विशाल जयस्वाल, विशाल भैसे, अलीम पठाण, मुकुंद माहुरे, विशाल बमनोटे या सरपंच, उपसरपंचांनी पंचायत समितीमध्ये धडक देऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
-----------------
घरकुलाच्या ‘ड’ यादीतील दोन हजारांवर घरकुलधारकांची नावे नाकारण्यात आली. सन २०११ च्या जनगणनेनुसार रद्द होण्याची प्रक्रिया आहे. हा शासनाचा निर्णय आहे. यासंदर्भात ६२ ग्रामपंचायतींमधील अनेक निवेदन आले आहेत.
- माया वानखडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, धामणगाव रेल्वे