स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : गुन्ह्याची कबुली, १.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त
फोटो पी २६ आरोपी
अमरावती : रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. आशिष ऊर्फ मनोज अंभोरे (२४, खानापूर) व शिवा राजू वाघमारे (१९, रा. परतवाडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी पथ्रोट, अंजनगाव व चांदूरबाजार पोलीस ठाण्यात वाटमारी व चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
पथ्रोट येथे १७ ऑगस्ट रोजी बाळकृष्ण बदुकले (रा. शिरजगाव) यांनी त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी जबरीने चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना पथ्रोट बसस्थानकाजवळ दोन संशयित इसम दुचाकीने वारंवार फिरून ये- जा करणाऱ्या महिलांकडे संशयितरित्या पाहत आहे, अशी माहिती मिळाली. पथ्रोट येथील बसस्थानकाजवळ सापळा रचून आरोपी आशिष ऊर्फ मनोज संजय अंभोरे व शिवा वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले.
जुलै, ऑगस्टमध्ये चांदूर बाजार येथे दोनदा, अंजनगाव तसेच पथ्रोट हद्दीत परसापूर ते वडगाव रोडवर पायदळ व मोटार सायकलने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींकडून १ लाख १५ हजार ५०० रुपयांचे २१ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी, नगदी १२०० रुपये, मोबाईल असा एकूण १,८६,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एसपी हरिबालाजी एन. यांच्या नेतृत्वात एलसीबीचे प्रमुख तपन कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.