संताप : दोन दिवसांत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणीअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील तुरखेड आलमपूरच्या शेतकऱ्यांवर पेरणी करताना हल्ला करणाऱ्या मार्डी येथील हल्लेखोरांना दोन दिवसांत अटक करा, या मागणीसाठी गावकऱ्यांनी रात्रभर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनास आ. बच्चू कडू यांनी भेट देऊन ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. तुरखेड गावात शनिवारी संदीप पाल महाराज यांच्या शेतात पेरणी करीत असताना सागर अरुण सुकळकर, प्रतीक अनिल वानखडे, कुलदीप गोकुलदास वाघ, नारायण कांबळी हे शेतमजूर हल्ल्यात जखमी झाले होते.तुरखेड गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य बरेच दिवसांपासून चोरीला जात असल्यामुळे गावकऱ्यांनी सामूहिक पाळत ठेवून अकोट तालुक्यातील मार्डी गावातील सात आरोपींना पकडून अंजनगाव पोलिसांच्या ताब्यात तीन दिवसांपूर्वी दिले होते. या आरोपींना संशयास्पद हालचालींचा आरोपाखाली पोलीस कोठडीत टाकण्यात आलो होते. परंतु कोणताही मुद्देमाल त्यांचेकडून जप्त न झाल्याने न्यायालयाने त्यांना व्यक्तीगत जमानतीवर मोकळे केले होते. सुटून आल्यावर या प्रकरणाचा वचपा घेण्याची धमकी न्यायालयाच्या परिसरातच आरोपींनी तुरखेडच्या गावकऱ्यांना दिली होती. ही धमकी प्रत्यक्षात उतरवून शनिवार २७ जून रोजी मारहाण करुन हल्लेखोर पसार झाले होते. या घटनेमुळे संतप्त झालेले तुरखेडच्या अंदाजे तीनशे गावकऱ्यांनी अंजनगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहून ठाणेदार गजानन पडघण तातडीने पोलीस पथकासह हल्लेखोरांचा शोध घेतला. पण हल्लेखोर फरार झाल्याने हाती लागले नाही. संशयित आरोपींपैकी एकास अटक करण्यात पोलिसांना यश आले. पण त्याला पाहून गावकऱ्यांनी हा आरोपी मारहाणीत सहभागी नव्हता, असे सांगितले. घटनेपासून रविवारी सायंकाळपर्यंत तुरखेडवासीयांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा अकोट पोलिसांच्या मदतीने हल्लेखोरांची शोेधमोहीम सुरू केली. मात्र वृत्त लिहिस्तोवर आरोपी हाती लागलेले नव्हते. या घटनेमुळे तुरखेड गावात दहशत आहे. पोलीस ठाण्याला स्वत:च्या नावाने फिर्याद नोेंदविण्याससुध्दा ते घाबरत असल्याचे दिसून आले. मार्डी येथील हल्लेखोर घरात घुसून कधीही मारहाण करतात, असा त्यांचा थेट आरोप आहे. या घटनेच्या निमित्ताने काही स्थानिक नेत्यांनी आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. मार्डीच्या हल्लेखोरांना शोधण्याचे आव्हान पोेलिसांसमोर उभे असल्याचे या घटनेच्या निमित्ताने दिसून आले.
तुरखेडच्या शेतकऱ्यांचा ठाण्यात ठिय्या
By admin | Updated: June 29, 2015 00:40 IST