इशारा : २७ ते ३० जूनदरम्यान तुरळक पाऊसअमरावती : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली व सतर्कतेचा इशारा दिला आहे. २७ ते ३० जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार असून तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात सार्वत्रिक स्वरुपात मान्सूनचा पाऊस झाला आहे. आणखी दमदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. आठवडाभरापासून झालेल्या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. वीज पडून जीवितहानी झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ओरिसावर कमी दाबाचे क्षेत्र आणि ५.८ किलोमीटरच्या वर चक्राकार वारे वाहत आहेत. गुजरात ते केरळ व पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे ठळक क्षेत्र जे २४ तासांत तीव्र होण्याचे संकेत आहे. त्यातच उत्तर प्रदेशावरही चक्राकार वारे आहेत. या स्थितीमुळे २१ ते २६ जूनदरम्यान बऱ्याच ठिकाणी पाऊस तर २२ ते २४ जूनदरम्याम मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे.
मंगळवार, बुधवारी मुसळधार !
By admin | Updated: June 23, 2015 00:56 IST