वाहतूक ठप्प, नादुरुस्त रस्त्याचा फटका
परतवाडा : मध्य प्रदेशातील इंदूर येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला घटांग ते बिहाली घाटात अपघात होऊन तो उलटला. त्यामुळे या आंतरराज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मेळघाटातील चिखलदरा पर्यटनस्थळासह धारणी-इंदूर आंतरराज्य महामार्ग मोठ्या प्रमाणात नादुरुस्त व खड्डेमय झाले आहेत. परिणामी प्रवासी बस, मालवाहू ट्रकसह इतर चालकांना जीवघेणी कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. अशातच गुरुवारी पहाटे इंदूर येथून अमरावतीकडे खत घेऊन जाणारा ट्रक बिहाली ते घटांग नजीकच्या वळणावर चालकाच्या प्रसंगावधानाने दरीत कोसळण्यापासून वाचला. त्याऐवजी अर्धवट अडकून रस्त्याच्या बाजूला कोसळला. त्यातील खताची पोती रस्त्यावर फेकली गेली. परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजता क्रेनच्या साहाय्याने ट्रक काढल्याने वाहतूक पूर्णत: सुरळीत झाली. नादुरुस्त व खड्डेमय रस्ते तसेच जीवघेण्या वळणावर रुंदीकरण करण्याची गरज असून, त्याच्याअभावी मोठ्या प्रमाणात वाहनांचे अपघात होत आहेत.