लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी रात्री १२.२० वाजता गाडगेबाबांच्या समाधीच्या दिशेने गुलाबपुष्पांचा वर्षाव करून गाडगेबाबांच्या हजारो अनुयायांनी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी गाडगेबाबांचा जयघोष करण्यात आला.२० डिसेंबर १९५६ रोजी रात्री १२.२० वाजता पेढी नदीच्या वलगाव येथील पुलावर गाडगेबाबांनी आपला देह ठेवला होता. त्यामुळे ठीक १२.२० वाजता गाडगेबाबांच्या मंदिरात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली जाते. यानिमित्त रात्री १० ते ११.४५ या वेळेत भरत रेळे महाराजांचे गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर संगीतमय कीर्तन झाले. त्यांच्या समाजप्रबोधनपर वाणीने गाडगेबाबांच्या अनुयायांना खिळवून ठेवले. यानंतर संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी गाडगेबाबांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. २० डिसेंबर १९५६ रोजीच्या रात्रीचा म्हणजे नागरवाडी ते वलगावपर्यंतचा गाडगेबाबांचा शेवटचा प्रवास व त्यांनी देह कसा त्यागला, त्यासंदर्भाची माहिती याप्रसंगी भाविकांना देण्यात आली. यानंतर गाडगेबाबांची स्मरण आरती करण्यात आली आणि त्यानंतर एक मिनिट मौन पाळून अनुयायांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या कीर्तनाचा जयघोष होताच समाधीच्या दिशेने फुलांचा वर्षाव झाला. गाडगेबाबांच्या जयघोषानंतर या सोहळ्याला उपस्थित झालेले हजारो अनुयायी मनातील, समाजातील जळमटं झाडून-पुसून स्वच्छ करण्याच्या नव्या निश्चयाने माघारी परतले. तत्पूर्वी त्यांना गाडगेबाबांचे तैलचित्र भेट म्हणून देण्यात आले. यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.दरम्यान, संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या अनुषंगाने यात्रा सुरू आहे. रविवारी समाधी मंदिरात दर्शन व यात्रेतील गर्दी वाढणार आहे.
समाधीच्या दिशेने फुलांचा वर्षाव वाहिली गाडगेबाबांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी रात्री १२.२० वाजता गाडगेबाबांच्या समाधीच्या दिशेने गुलाबपुष्पांचा वर्षाव ...
समाधीच्या दिशेने फुलांचा वर्षाव वाहिली गाडगेबाबांना श्रद्धांजली
ठळक मुद्दे६३ वा पुण्यतिथी महोत्सव । रात्री १२.२० वाजता गाडगेबाबांचा जयघोष