एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प : जंगल वाचविण्याचा संदेशअमरावती : आदिवासी कुटुंब डोंगराळ, अतिदुर्गम व जंगलात वास्तव्य करीत आहेत. आदिवासी जंगलामधून लाकुडफाटा व इतर साहित्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करतात. त्यामुळे जंगलतोड होते. परिणामी पर्यावरणाला बाधा पोहोचते. जंगलतोड होऊ नये, त्यांच्या घरातील वातावरण धुरापासून मुक्त रहावे व त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी हे लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांच्याकडून दारिद्रयरेषेखालील आदिवासीकरिता घरगुती गॅस संच वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. याचा लाभ घेण्याकरिता आदिवासींना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. जसे योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी हा आदिवासी जमातीचा असावा, दारिद्रय रेषेखालील असल्याचे संबंधित प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/दाखला अर्जासोबत जोडावा, सदरचा लाभ कुटुंबाकरिता असल्यामुळे अर्जासोबत रेशनकार्ड जोडावेत, यापूर्वी कोणत्याही शासकीय विभागाकडून गॅस संचचा लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र सादर करावेत, जो लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे, त्या संचाचे हस्तांतरण करता येणार नाही व संच विकता येणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात यावी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, दारिद्रयरेषेखालील असल्याचा दाखला अर्जासोबत जोडावा, अर्जदाराचे अलिकडच्या काळातील पासपोर्ट छायाचित्र हवा.योजनेचा लाभ देताना विधवा, परित्यक्त्या व अदिम जमातीच्या कुटुंबांना याचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार आहे. लाभ घेणाऱ्यांनी कोणतीही दिशाभूल करणारी माहिती व बनावट कागदपत्र कार्यालयास सादर केल्यास व ते निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. वरील निकष व वेळोवेळी निर्गमित होणारे सूचनांच्या अधीन राहून लाभ देण्याची कार्यवाही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी या कार्यालयाकडून केली जाणार आहे. याकरिता जास्तीत जास्त संख्येने अर्ज सादर करण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांनी केले आहेत. (प्रतिनिधी)
आदिवासी कुटुंबांना गॅस सिलिंडर
By admin | Updated: November 2, 2016 00:31 IST