गुरुकुंज (मोझरी): शॉपिंगमधील सर्वाधिक आनंद नावीन्यपूर्ण वैविध्य असलेल्या रेडिमेड कापड खरेदीमधून मिळायला. पण, कोरोना संकटाने मानवी गरजा व आवश्यकता याची जणू वर्गवारीच केली आणि आज कापड खरेदीचा ट्रेंडच बदलला. रोजच्या वापरातील कापड खरेदीकडे सर्वसामान्य ग्राहकांचा लॉकडाऊनच्या भीतीने कल दिसून येत आहे.
शॉपिंगला हा शब्द उत्साहाला उधाण आणायचा. पण, कोरोना संकटात सर्वसामान्य कुटुंबातील आर्थिक गणित बिघडले असून, रोजच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आता नेमकी गरज आणि तितकाच खर्च असे ठोकताळे सर्वसामान्य कुटुंबीय मांडत आहे. त्याचा फटका अनेक व्यावसायिकांनाही बसला आहे. ‘शौक बडी चीज है’ ही उक्तीच बासनात गुंडाळली आहे. त्याचा फटका मुखशुद्धी करणाऱ्या व्यवसायालाही बसला. काही तासांत हजारो रुपयांचा होणारा खप आता काही रुपयांवर येऊन ठेपला. अशीच काहीशी अवस्था ग्रामीण कापड विक्रेत्यांची आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक लग्न समारंभ व त्यावर भरमसाठ खर्च असे गणित राहायचे. पण, आता त्यावरही निर्बंध आले. सोबतच कापड खरेदी करताना दैनंदिन वापरासाठी आवश्यक बरमुडा, नाईट पँट, बनियान, टी-शर्ट अशा कापडाला अधिक मागणी आहे. कशी आणि कोणती वेळ येईल आणि पुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत सामान्य नागरिकांना जावे लागेल, त्याची अद्यापही भीती आहे. त्यामुळे अन्न धान्य, किराणा जमवून ठेवतात. इतके मात्र खरे, कोरोना संकटाने बेफाम झालेल्या मानवाला ब्रेक लावायला शिकवले आणि हीच आजची वस्तुस्थिती आहे.
-------------