१ जुलैला वृक्ष लागवड : किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहनअमरावती : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १ जुलै, २०१६ रोजी २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ही मोहीम लोकचळवळ व्हावी, यासाठी अमरावती शहरात सोमवारी भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथून निघालेल्या या वृक्षदिंडीचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आला.टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीत २ कोटी वृक्ष लावू या, जगवू या व महाराष्ट्र आपला हरित करूया, वृक्ष लावा वृक्ष जगवा, एक दिवस आपल्या भविष्यासाठी चला हरित महाराष्ट्राच्या चळावळीत सहभागी होऊ या, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकत्र येऊ या, एकाच वेळी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावू या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. वृक्ष दिंडीत अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील वन विभागाच्या पेट्रोलिंग कार, सामाजिक वनिकरणाची वाहने सहभागी झाली होती. या वाहनावर वृक्ष लागवडीच्या जागृतीबाबत फलक लावण्यात आली होती. तसेच दिंडीमध्ये सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.विभागीय आयुक्त कार्यालयात समारोप झालेल्या या दिंडीमध्ये आमदार राजू तोडसाम, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, मुख्य वनसंवरक्षक संजीव गौड, उपवनसंवरक्षक अधिकारी निनू सोमराज, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रदीप मसराम आदी मान्यवर सहभागी झाले होते. वृक्ष दिंडीचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयात झाल्यानंतर कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री प्रवीण पोटे, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. (प्रतिनिधी)पुढील पिढीच्या आरोग्यासाठी वृक्ष लावा : पालकमंत्रीपुढील पिढीच्या आरोग्यासाठी वृक्ष लावा व २ कोटी वृक्ष लागवड हे एक दिवसाची शासकीय मोहीम असे त्याचे स्वरुप न राहता वृक्ष चळवळ व्हावी या दृष्टीने वृक्ष लावा मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. फक्त वृक्ष लागवड महत्त्वाची नसून त्याचे संगोपनदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी मांडले. २ कोटी वृक्ष लागवडीबाबत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला आमदार यशोमती ठाकूर, प्रभुदास भिलावेकर उपस्थित होते. वृक्ष चळवळ हे फक्त सामाजिक वनीकरण विभागाचे काम नसून सर्वांची चळवळ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात वनविभाग व सामाजिक वनीकरण, शासनाचे इतर विभाग, स्वयंसेवी, अशासकीय संस्था आदींच्या माध्यमातून एकूण ४ लाख ८५ हजार झाडे लावण्याचे नियोजन असल्याची माहिती उपसंचालक सामाजिक वनीकरण पी.डी. मसराम यांनी दिली. १ जुलै रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ यावेळेत वृक्ष लागवड केली जाईल. त्यासाठी रोपवाटिकेतून २७ जूनपूर्वी रोपांची वाहतूक करावयाची आहे. ज्या विभागांनी अजूनही खड्डे खोदण्याची कार्यवाही केलेली नाही, त्यांना रोप मिळणार नाही, अशी कडक सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. यावेळी सातही उपविभागीय अधिकाऱ्यायांनी जिल्हा व तालुका समन्वय समितीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
हरित महाराष्ट्रासाठी वृक्ष दिंडी
By admin | Updated: June 21, 2016 00:10 IST