बडनेरा : येथील वाढती लोकसंख्या, आजुबाजुंची गावे व येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता तीन वर्षांपूर्वी बडनेऱ्यात ट्रामा केअर युनिट हा अत्याधुनिक दवाखाना शासकीय निधीतून उभारण्यात आला आहे. मात्र तीन वर्षांपासून या वास्तुचे लोकार्पण केवळ राजकारणामुळे रखडले आहे. बडनेऱ्यातील ट्रामा केअर युनिट रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन १६ आॅक्टोबर २०११ रोजी करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या दवाखान्याच्या इमारतीचे काम युध्दस्तरावर पूर्ण केले व ती ईमारत जिल्हा प्रशासनातील आरोग्यविभागाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली केल्या. मात्र तब्बल एक वर्षापर्यंत जिल्हा प्रशासनाने ही ईमारत आपल्या ताब्यात घेतली नव्हती. एवढ्यात या ईमारतीचे हस्तांतरण झाले. त्यानुसार मागील महिन्यात बडनेरातील ट्रामा केअर युनिट लोकांच्या सेवेत रुजू व्हावे यासाठी लोकार्पणाची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र ऐन वेळेवर उद्घाटनासाठी येणाऱ्या मंत्र्याचा दौरा रद्द झाल्यामुळे ट्रामा केअर युनिट ‘जैसे थे’ स्थितीत आहे. ही ईमारत केवळ शोभेची ठरत आहे. ट्रामा केअर युनिट सुरु करण्यासाठी उद्घाटनाच्या दिवशी सर्व तयारी करण्यात आली होती. डॉक्टरांचा व इतर कर्मचाऱ्यांचा स्टाफ देखील आणण्यात आला होता. रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सर्वसोई-सुविधा याठिकाणी पुरविण्यात आलेल्या होत्या. मात्र केवळ मंत्रीमहोदय न आल्याने ट्रामा केअर युनिट लोकांच्या सेवेत रुजू होऊ शकलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून बडनेरावासीय व परीसरातील मोठ्या संख्येतील खेड्यापाड्यावरचे लोक हा ट्रामा केअर दवाखाना कधी सुरु होणार या प्रतीक्षेत आहेत. अपघातांचे प्रमाण या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. एक्सप्रेस हाय-वेवरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातांचे प्रमाण ही वाढते आहे. या परिसरात घडलेल्या अपघातांमधील रुग्णांना अमरावतीच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी नेले जाते. हे अंतर लांब असल्याने अनेक रुग्णांवर जीव गमविण्याची वेळ येते. महाराष्ट्र शासनाने करोडो रुपये खर्च करुन बडनेरात बांधलेले ट्रामा केअर युनिट गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी जीवनदायी ठरु शकते. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परिसरात या मागणीचा जोर आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली कराव्या, अशी मागणी होऊ लागली आहे. (शहर प्रतिनिधी)
ट्रामा केअरचे भाग्य कधी उजळणार !
By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST