चांदूर रेल्वे : दुचाकीवर गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास चांदूर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी संजय गिरधर फब्यानी (३८) व अमित गिरधर फब्यानी (३२, रा. धनराज नगर) हे चांदूर रेल्वे शहरातून बाहेरगावी एका दुचाकीने थैल्यांमध्ये गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत असल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहराबाहेर स्मशानभूमीजवळ त्यांची दुचाकी थांबविली. त्यांच्याजवळून दोन पिशव्यांमधील १० हजार ८९९ रुपये किमतीचा सुंगंधित तंबाखू व गुटखा आणि ५० हजार रुपयांची दुचाकी असा एकूण ६० हजार ८९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८, २७०, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार मगन मेहते, पीएसआय धोंडे, कर्मचारी विनोद डाखोरे, गजेंद्र ठाकरे, अविनाश वाघमारे, मनोज वानखडे, अमर काळे, जगदीश राठोड यांच्या पथकाने कारवाई केली.
दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST