अंजनगाव सुर्जी : येथील दत्तघाट स्मशानभूमीत नगर पालिकेच्यावतीने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून २८ लाख रुपये खर्च करून रस्ता, श्रद्धांजली सभामंडप व इतर सौंदर्यीकरणाची कामे करण्यात आली. या स्थळाचे ‘दत्तघाट विसावा धाम’ असे नामकरणसुद्धा करण्यात आले. पूर्वी सोईसुविधांअभावी ओसाड अवस्थेत असलेले हे स्थळ आता प्रसन्न झाले आहे.
शहराच्या उत्तर भागात शहानूर नदीकाठी असलेल्या दत्त मंदिर व स्मशानभूमीत केवळ दत्तमंदिराचे सभागृह शेड उभारण्यात आले होते. मात्र, आता पालिकेच्यावतीने स्मशानभूमीतील अंतर्गत रस्ता, श्रद्धांजली सभामंडप, संरक्षण भिंत, रंगरंगोटी करण्यात आली. माजी आमदार रमेश बुंदिले व नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या हस्ते सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सुमेध अलोने, उपाध्यक्ष रवींद्र बोडखे, बांधकाम सभापती सचिन जायदे, आरोग्य सभापती सतीश वानखडे, नगरसेवक मनोहर भावे, भुपेंद्र भेलांडे, अजय पसारी, विनोद देशमुख, शीला सगणे, रमेश जायदे, विकास येवले, सचिन गावंडे, हेमंत माकोडे, नीलेश ईखार, अविनाश पवार, कार्यालय अधीक्षक गोविंद त्रिपुरारी, नगर अभियंता दिनेश ठेलकर, बंडू हंतोडकर, अशोक लोटिया, पंकज मोदी आदी उपस्थित होते.