अंजनसिंगी : यवतमाळ ते रिद्धपूर रस्ता दुरुस्तीचे काम सध्या अंजनसिंगी ते कुऱ्हा या टप्प्यावर सुरू आहे. काम करणाऱ्या कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता खोदून त्यात काळी माती टाकली आहे. बुधवारी संध्याकाळी आलेल्या पावसामुळे रोडवर चिखल होऊन वाहतूक ठप्प झाली. काही वाहने त्यामध्ये फसली होती. सदर रस्त्याच्या कामावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तिवसा यांची देखरेख मुळीच नाही. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. पावसामुळे अनेक दुचाकीचालकांना फसलेली वाहने तेथेच परत जावे लागले. मात्र, याकडे काम करणाऱ्या कंत्राटदाराने लक्ष दिले नाही. पुलाचे बांधकाम सुरू असताना, वळण रस्त्यावर कुठलीही सूचना नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी कंत्राटदाराला योग्य काम करण्याची तसेच रस्त्यावर मातीऐवजी मुरूम, गिट्टी टाकून ताबडतोब दबाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.
---------------