अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी समूह संसर्गाची भीती बळावली आहे. त्यामुळे आता व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी बंधनकारक आहे. निश्चित कालावधीत कोराेना चाचणी न केल्यास संबंधित दुकाने सील केली जाईल, असा आक्रमक पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
पुणे, मुंबई शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातील समूह संसर्गाची स्थिती उद्भवली असून, शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांना त्यांच्या सहकाऱ्यांसह कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यात ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतील. काेरोना चाचणी न केल्यास सदर व्यापारी, दुकानदारांची प्रतिष्ठाने सील करणाऱ्यासह दंड आकारला जाईल. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीपासूनच कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. मार्च महिन्यातही हीच स्थिती असून, आता व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
----------------
अहवाल तपासणीसाठी स्वतंत्र पथक
व्यापारी, दुकानदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी केली अथवा नाही, याचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाचे स्वतंत्र पथक असणार आहे. शहर, ग्रामीण अशा दोन्ही भागातील व्यापारी, दुकानदारांची ॲन्टिजेन, आरटीपीसीआर चाचणी अहवाल तपासले जातील. यादरम्यान कोरोना चाचणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित दुकान, प्रतिष्ठान सील केले जाणार आहे. समूह संसर्ग राेखण्यासाठी व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक आहे.
-------------------
ज्येष्ठांनी लस टोचून घ्यावी
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला असून लसीची टंचाईदेखील नाही. कुंटुंबातील तरुणांनी ज्येष्ठांच्या कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. शहर, ग्रामीण क्षेत्रात लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.
------------------
व्यापारी, दुकानदारांना येत्या दाेन आठवड्यात कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. ॲन्टिजेन, आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या कराव्या लागतील. जे व्यापारी, दुकानदार व त्यांचे सहकारी निर्धारित वेळेत चाचणी करणार नाही, अशी दुकाने, प्रतिष्ठाने सील केले जातील.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी