अमरावती : जिल्ह्यातील टंचाई नापिकी आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा ग्रामजिवनावर होत असलेला परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन करून उपाययोजना करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व ८४३ ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशांनुसार उद्या १० डिसेंबर रोजी अधिकारी-कर्मचारी गाव-खेड्यांमध्ये मुक्काम करतील.यावर्षी बळीराजाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. त्यामध्ये कमी पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशा संकटामुळे जिल्ह्यातील १९८१ गावांवर संकट आले आहे. महसूल विभागाने हा प्रकार हेरला. एरवी ही प्रक्रिया शासकीयच. मात्र, यावेळी या प्रक्रियेत सकारात्मकता व संवादाची भर पडली. यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी, गावकऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आणि त्यातून गाव मुक्कामाची संकल्पना पुढे आली. त्यानुसार सर्व ८४३ ग्रामपंचायतींमध्ये वरिष्ठ शासकीय वर्ग १ व २ चे अधिकारी, महसूलमधील मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी व इतरही सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना गावात मुक्काम करावा लागणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी गित्ते व निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांनी दिले. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकारी करीत आहेत. अतिरिक्त मनुष्यबळाची देखील जुळवाजुळव सुरू आहे. गाव मुक्कामातून हाती येणाऱ्या माहितीतून पुढील कृती आराखडा तयार करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या सर्वांचे नियोजन व अंमलबजावणी निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार करीत आहेत. गावकऱ्यांचा अहवाल कागदोपत्री तयार करण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समस्या अधिक प्रखरपणे समोर येण्यास मदत होईल, असा उद्देश यातून साध्य होणार आहे. (प्रतिनिधी)
आज अधिकारी कर्मचारी करणार गावात मुक्काम
By admin | Updated: December 9, 2014 22:42 IST