भाजप बाजी मारणार : विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेचअमरावती : महापालिकेचे नवे शिलेदार ९ मार्च रोजी ठरणार आहे. महापालिकेचे १५ वे महापौर म्हणून संजय नरवणे, तर संध्या टिकले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ४५ सदस्य संख्येच्या बळावर भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. विरोधी पक्षनेतेपदाची माळ काँग्रेसचे बबलू शेखावत यांच्या गळ्यात पडेल, हे, स्पष्ट झाले आहे.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. नवनिर्वाचित ८७ सदस्य हे ईन कॅमेरा हात उंचावून मतदान करतील, अशी माहिती महापालिकेचे सहायक निवडणूक अधिकारी मदन तांबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसह सभागृह नेते, विरोधीपक्ष नेते, विविध गटनेते पदाची नियुक्ती होणार आहे. महापौर पदासाठी भाजपचे संजय नरवणे, तर काँग्रेसच्या शोभा शिंदे यांच्यात लढत होईल, असे दिसून येते. उपमहापौरपदासाठी भाजपच्या संध्या टिकले, काँग्रेसचे अब्दूल वसीम व एमआयएमचे अब्दूल अफराज यांच्यात लढत होईल, असे प्राप्त उमेदवारी अर्जावरुन दिसून येते. मात्र काँग्रेसने महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्जाची माघार घेतल्यास ही निवडणूक अविरोध होईल, असे बोलले जाते. विभागीय आयुक्तांकडे महापालिकेतील नवनिर्वाचित सदस्यांनी स्थापन केलेल्या गटानुसार गुरुवारी या नेत्यांची नावे जाहीर होतील. यात भाजपचे सभागृह नेतेपदी सुनील काळे, उपनेतेपदी विवेक कलोती, विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे बबलू शेखावत, शिवसेनेचे गटनेतेपदी प्रशांत वानखडे, एमआयएमचे गटनेतेपदी अब्दूल नाजीम, तर बसपा गटनेतेपदी चेतन पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आज महापौर, उपमहापौरांची निवडणूक
By admin | Updated: March 9, 2017 00:09 IST