तिवसा : कोरोना संसर्गाला आळा घालण्याकरिता ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊन आदेशाला तिवसा तालुका, शहरात खो मिळाल्याचे पहिल्या दिवशी आढळून आले. दुपारनंतर पोलीस दुकाने बंद करण्यासाठी सरसावल्याचे दिसून आले.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, मंगळवारी सकाळी तालुक्यासह तिवसा शहरात आदेशाला किरकोळ व्यावसायिकांनी खो दिल्याचे निदर्शनास आले. शहरातील काही मार्केटमधील मोठी दुकाने, हॉटेल, सलून, मोबाईल शॉप, पानठेले सर्रास सुरू होते. बाजाराचा दिवस असल्यामुळे गर्दी उसळली होती. महसूल प्रशासन व नगरपंचायतचे पथक कुठेही फिरकताना दिसले नसल्यामुळे कोणते निर्बंध आहे की नाही, याबाबतही नागरिक संभ्रमावस्थेत होते. अखेर तिवसा पोलीस प्रशासन सरसावले आणि दुपारपासून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.