पान २ ची बॉटम
वाळू माफियांचा शासनाला लाखोंचा चुना, प्रशासनाचे दुर्लक्ष
परतवाडा : महसूल विभागाकडून वाळूघाटाचा लिलाव घेतल्यानंतर निर्धारित उपशापेक्षा कितीतरी पटीने अधिक रेती चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. एकाच रॉयल्टी पासवर दिवसभर दोन ते तीन वेळा रेतीची चोरी व वाहतूक केल्या जात असून, वाळूमाफिया शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.
भातकुली तालुक्यातील पोहरा येथील रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. परतवाडा-अमरावती मार्गावरील पूर्णा नदीपात्रातील हा रेतीघाट आहे. निर्धारित वजा लिलावात घेतलेल्या रेतीघाटाला सोडून अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातील रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले. हा प्रकार दस्तुरखुद्द अचलपूर महसुल विभागाने केलेल्या कारवाईत उघडकीस आला. त्यामुळे अवाढव्य असलेले पूर्णा नदीचे पात्र चोरून पोखरण्याचा सपाटा वाळूमाफियांनी चालविला आहे. रेतीघाटातून ट्रकमध्ये दोन ब्रास रेती नेण्याचा अधिकार असताना, प्रत्यक्षात तीन ब्रासपेक्षा अधिक रेती उचलून नेली जात आहे. दुसरीकडे एका रॉयल्टी पासमध्ये एक फेरी (ट्रीप) रेती नेण्याचा नियम असताना, त्याच पासवर दोनपेक्षा अधिक ट्रीप करीत असल्याने प्रत्यक्षात आठ ते नऊ ब्रास रेती चोरून नेली जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल रेती माफिया बुडवित असल्याचे चित्र आहे. कालपर्यंत अवैध रेतीची तपासणी करणारे पथक रस्त्यावरून बेपत्ता झाल्याचे चित्र आहे.
बॉक्स
पहाटे ४ वाजता लागतात ट्रक
रेती उत्खननाचे नियम पूर्णत: पायदळी तुडवल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वीच प्रकाशित केले होते. पोहरा पूर्णा व परिसरात रेतीघाटावर रेती भरण्यासाठी पहाटे ४ वाजताच ट्रक लावून रेती भरली जात असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उत्खनन करण्याची परवानगी असताना सर्व नियम बाजूला ठेवण्यात आले आहेत. त्यावर महसूल प्रशासनाने आर्थिक हित पाहता, झोपेचे सोंग घेऊन मूग गिळून असल्याची चर्चा आहे.
बॉक्स
सुनावणीनंतरच दंडात्मक कारवाई
अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातून पाच ट्रक रेती जप्त करण्यात आली. त्या ट्रकमालकांना गुरुवारनंतर सोमवारी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. परंतु, त्यांनी कुठल्याच प्रकारचे म्हणणे वृत्त लिहिस्तोवर मांडले नव्हते. त्यामुळे या चोरट्यांवर महसूल विभाग किती दंड आकारतो, हे पाहणी औत्सुक्याचे ठरणार आहे.
------------