अचलपूर/परतवाडा : अचलपुरातील रेल्वे स्टेशन चौकातून तीन तलवारी व दोन चाकू जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. २० मार्च रोजी पहाटे ४ च्या सुमारास अचलपूर पोलिसांनी ही कारवाई केली. विजय बालुराव वानखडे (२४, रा. कालंकामाता झोपडपट्टी परतवाडा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
रेल्वे स्टेशन, अचलपूर चौकात एक इसम तलवारी व चाकू विक्री करण्यासाठी येत असल्याच्या माहितीवरून तेथे सापळा रचण्यात आला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्या ताब्यातून प्रत्येकी १,२०० रुपये किमतीच्या तीन लोखंडी तलवारी व रुंद पात्याचे दोन लोखंडी चाकू असा एकूण ४,८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी आरोपी विजय वानखडेविरुध्द कलम ४/२५ आर्म अॅक्ट सहकलम व जिल्हाधिकारी यांचे कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन केल्यामुळे कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली. एसडीपीओ पोपटराव अबदागिरे, अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि राजेश मालेराव, नापोकाँ पुरुषोत्तम बावनेर, विशाल, विलास, संदीप, मुजफर यांनी ही कारवाई केली.