पान २ ची बॉटम
नातवांकरिता आजी बनवते खिचडी
परतवाडा : चिखलदरा तालुक्यातील पस्तलई गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ तीन विद्यार्थी असून, दोन शिक्षक त्याठिकाणी कार्यरत आहेत. या तीन विद्यार्थ्यांकरिता त्यांची आजी शाळेत खिचडी बनवते.
पस्तलई येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची दोनशिक्षकी शाळा आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अतिसंरक्षित क्षेत्रातील पस्तलई गावचे २०१९ मध्ये अचलपूर तालुक्यातील येवता व वडगाव फत्तेपूर येथे पुनर्वसन केले गेले. यातील ९९ टक्के कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. यादरम्यान येथील पोलीस पाटील लालमन धांडेकर व त्यांचा भाऊ सखाराम धांडेकर आजही पस्तलईत वास्तव्यास आहेत. गावातील शाळाही गावात आहे. यातील सखाराम धांडेकर यांच्या मुलांचे कुटुंबीय वडगाव फत्तेपूर येथे पुनर्वसित झाले आहेत. पुनर्वसित झाल्यानंतर त्यांनी आपली मुले वडगावच्या शाळेत न टाकता पस्तलईच्या शाळेतच ठेवली आहेत. आजी-आजोबांकडे ती वास्तव्यास आहेत आणि त्यांच्यावर दोन शिक्षक तेथे कार्यरत आहेत. तीन विद्यार्थ्यांकरिता एक शाळा, दोन शिक्षक आणि दोन घरांकरिता एक पोलीस पाटील यामुळे मेळघाटातील पस्तलई हे गाव लक्षवेधी ठरले आहे. गावच्या पुनर्वसनानंतर तेथील शाळा पुनर्वसित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रघात आहे. वैराट गावचे पुनर्वसन अचलपूर तालुक्यातील नरसाळा येथे झाल्यानंतर वैराटची शाळा नरसाळ्याला स्थलांतरित झाली आहे.
शाळा स्थलांतरित करा
पस्तलई गावचे पुनर्वसन झाले आहे. गावात केवळ दोनच घरे आहेत. गावात शाळेत जाणारा विद्यार्थी नाही. पस्तलई येथील शाळा येवता या पुनर्वसित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी, असे पत्र २७ जानेवारीला चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अचलपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे दिले आहे.
कोट
पस्तलई येथील एकही विद्यार्थी तेथील शाळेत नाही. शाळेतील ते तीन विद्यार्थी वडगाव फत्तेपूर येथे पुनर्वसित झालेल्या कुटुंबीयांची आहेत. पस्तलई येथील शाळा येवता येथील पुनर्वसित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी. तसे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
- मयूर भैलुमे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा.
कोट
पत्र बघितल्यानंतरच त्यावर प्रतिक्रिया देता येईल. पत्र माझ्यापुढे अजून आलेले नाही.
वसंत मनवरकर, गटशिक्षणाधिकारी, अचलपूर.