व्यवस्थापन परिषदेची सभा गाजली : शुल्कवाढीच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटना आक्रमकअमरावती : अवाजवी शुल्कवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पावित्रा घेऊन कुलगुरू मोहन खेडकर यांना धारेवर धरले. त्यांच्या दालनात तीन तास गोंधळ घालून शुल्कवाढीबाबत जाब विचारला. या गोंधळामुळे पोलिसांनाही पाचारण करावे लागले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विद्वत्त परिषदेने २ मे रोजी ३० टक्के शुल्कवाढीचा निर्णय दिल्याने विद्यार्थी व पालकांवर आर्थिक भुर्दंड वाढणार आहे. हा गरीब विद्यार्थ्यांवर एकाप्रकारे अन्याय असल्याचे मत विविध संघटनांनी मांडले. हा निर्णय चुकीचा असल्याचे मत संघटनांचे आहे. या शुल्कवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध संघटनांनी विद्यापीठात हल्लाबोल करुन व्यवस्थापन परिषदेच्या सभेत गोंधळ घालून उपस्थित पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोर्चा कुलगुरुंच्या दालनाकडे वळविला. कुलगुरुंच्या दालनात शेकडो कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल माटोडे यांच्यासह ललित झंझाड, प्रवीण दिधाते, स्वराज ठाकरे, वैभव इंगोले, नीलेश सावळे, तुषार अंभोरे, विशाल आठवले, मिथून सोळंके, अतुल थोटांगे, अमित गोटे, आशिष राऊत यांच्यासह एनएसयूआयचे अनिकेत ढेंगळे, पंकज मोरे, शिवा भोंगाळे, योगेश चारथळ, विक्की पांडे, मयुर पांडे, विद्यार्थी स्वाभिमानीचे अनूप अग्रवाल, अभिजित देशमुख, नितीन हिरूळकर, अनूज चुके, सत्यम राऊत, विशाल बोबडे, शुभम बोयत, अनिकेत देशमुख, आकाश राजगुरे, युवा सेनेचे राहुल नावंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कुलगुरुंच्या दालनात तीन तास गोंधळ
By admin | Updated: June 13, 2015 00:28 IST