पावसाचा कहर : विद्युत विभागाचा भोंगळ कारभारवैभव बाबरेकर अमरावतीतीन दिवसांच्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो घरांतील विद्युत पुरवठा खंडित होऊन वीज वितरण कंपनीच्या ढिसाळघाई कारभारामुळे वीज ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तीन दिवसांमध्ये एकट्या अमरावती शहरात चार हजारांवर तक्रारी विद्युत विभागाला प्राप्त झाल्या. परंतु या तक्रारींचा निपटारा करण्यात नियोजन शून्य विद्युत विभागाला तीन दिवसांंनंतरही यश मिळाले नाही. अद्यापही अर्ध्याअधिक तक्रारींचा खच वीज तक्रार निवारण केंद्रात पडून आहेत. वादळी पावसाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी घरे व झाडे कोसळली. त्याचबरोबर विद्युत तारा व खांबसुद्धा तुटल्याने काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे हजारो कुटुंबीय अंधारात आहेत. आता पाऊस ओसरल्याने वीज कंपनीने तुटलेले विद्युत खांब व तारा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मुख्य लाईन दुरुस्तीचे काम कत्रांटदारामार्फत केले जात आहे. मात्र मुख्य लाईनचा वीजपुरवठा सुरु झाला तरीसुध्दा हजारो नागरिकांच्या घरातील वीजपुरवठा अजूनही बंद आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष नाहीपावसाळ्यात वादळाने दरवर्षी मोठे नुकसान कंपनीला सहन करावे लागते. पावसाळ्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही कार्यप्रणाली कंपनीकडून राबविण्यात आली नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अडचणींना नागरिकांनाच तोंड द्यावे लागत आहे. बालक व रुग्णांचे हालशहरातील हजारो घरांतील विद्युत प्रवाह खंडीत असल्यामुळे सर्वाधिक त्रास बालक व वयोवृध्द रुग्णांना होत आहे. डासांमुळे लहान बालकांसह घरातील मंडळी हैराण झाली आहे. काही ठिकाणी आॅक्सिजनवर रुग्ण आहेत तर काही ठिकाणी वृध्द आजारी अवस्थेत आहेत. त्यांना खंडीत विजेचा सामना करावा लागत आहे.तक्रारीचे पाने फाडल्याचा आरोपवीज तक्रार निवारण केंद्राकडे तक्रारीचा खच झाल्याने नोंद वहीतील पानेच कर्मचाऱ्याने फाडल्याचे प्रकार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील एका केंद्रावर तक्रार केलेल्या नागरिकांच्या तक्रारीची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक तक्रार निवारण कें द्रात २०० च्या वर तक्रारीजिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे चार विभागीय कार्यालये असून त्यापैकी १ शहरात व ३ ग्रामीण भागात आहेत. या कार्यालयांतर्गत २३ सबडिव्हीजन असून त्यापैकी ३ शहर व अन्य ग्रामीण भागात आहेत. शहरात १९ तक्रार निवारण केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रात सुमारे दोनशेच्या वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील अर्ध्याही तक्रारींचा निपटारा करण्यात विद्युत विभागाला यश मिळाले नाही.
तीन दिवसांपासून चार हजार घरे अंधारात
By admin | Updated: July 26, 2014 01:08 IST