नागरिक संतप्त : ११ गाव पाणीपुरवठा योजनेवर धडक आंदोलन राजुराबाजार : राजुराबाजार ग्रामपंचायतीला ११ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविले जाते. परंतु १२ दिवसांपासून पाणीपुरवठा योजनेने पुरवठा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहे. ग्रामपंचायतीने विनवण्या करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने उपसरपंचासह शेकडो नागरिक व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्हाल्व्ह सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ठाणेदार दिवेच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. राजुराबाजार गाव सात हजार लोकवस्तीचे आहे. येथे ११ गाव राजुराबाजार ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु मागील १२ दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळला असून त्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अखेर नागरिकांचा असंतोष अनावर होऊन शेकडोे नागरिकांसह सरपंचा रेखा साबळे, उपसरपंच शिवा शिवहरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, गजू ढोकेसह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी दुपारी साडेचार वाजतादरम्यान पाणीपुरवठा योजनेवर धडक देऊन व्हॉल्व्ह सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार गोरख दिवेंसह पोलीस कर्मचारी राजुराबाजारात दाखल होऊन समस्या समजावून घेतली. यावेळी पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष पांडुरंग निकम उपस्थित नसल्याने माजी अध्यक्ष किशोर गोमकाळे यांनी माहिती दिली. नागरिकांची समजूत घातल्यांनतर पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
राजुराबाजारात पाणीपुरवठा नाही
By admin | Updated: June 22, 2016 00:14 IST