४ पदे अविरोध : ग्रामपंचायतींच्या १५३ पदांसाठी २७ जुलै रोजी मतदान, २९ ला मतमोजणीअमरावती : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २७ जुलै रोजी मतदान होणार आहे. २७४ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होती. अंतिम मुदतीपर्यंत ५७ पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. ६४ सदस्य पदे बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात १५३ सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे व रिक्त राहिलेल्या सदस्यपदांसाठी आयोगाला पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या १८ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५४ प्रभाग व १३६ सदस्य संख्या आहे. यापैकी २६ सदस्य अविरोध निवडून आल्याने ११० सदस्यपदांसाठी २७ जुलै रोजी मतदान होणार आहे. कुठल्याही तांत्रिक कारणामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एकही सदस्यपद उमेदवारी अर्जाअभावी सदस्यपद रिक्त राहिले नाही, हे विशेष.जिल्ह्यात ९१ ग्रामपंचायतीमधील ११७ प्रभागातील १३८ रिक्तपदांसाठी ही निवडणूक जाहीर होती. मात्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या तारखेनंतर ५७ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाही, हे स्पष्ट झाले. तसेच त्यामुळे ८१ पदांसाठी ही निवडणूक होणार होती. परंतु यापैकी ३८ सदस्यपदे ही बिनविरोध निवडून आल्यामुळे ४३ सदस्य पदांसाठी २७ जुलै रोजी मतदान व २९ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. भातकुली तालुक्यामधील बोरखडी ग्रामपंचायतीमध्ये श्रीकृष्ण पवार, सुरेश ढोलवाडे, कुसूम थोरात, नांदगाव तालुक्यामधील शिरपूर ग्रामपंचायतीचे प्रवीण आरोकर, विजया मेश्राम, दिगांबर लांडे, चंदना केशरखाते, ललिता बेडेकर, राजेंद्र भोसले, शोभा भोसले, धामणगाव तालुक्यामधील नारायण आत्राम, अचलपूर मधील वझ्झर ग्रामपंचायतीचे शालिकराम कास्देकर, लक्ष्मण सावलकर, लता तोटे, शोभा बोरेकर व चिखलदरा तालुक्यामधील खिरपानी ग्रामपंचायतीचे सीताराम जामूनकर, तारा सुरले, साहेबराव सुरले, नंदलाल कोरल, सुमन सुरले, निशा सुरले, माखला ग्रामपंचायतीच्या प्रमिला कास्देकर, मंगराय कास्देकर, रामेश्वर जांभेकर, शांती दारबिंगे, किशोरीलाल दहीकर, अढाव ग्रामपंचायतीच्या लालजी दहीकर अविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागात चर्चा रंगत आहे. (प्रतिनिधी)
५७ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्जच दाखल नाही
By admin | Updated: July 18, 2015 00:23 IST