चांदूर रेल्वे : गुरुवारी मध्यरात्री शहरातील चार दुकानांसह तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथे एका पानठेल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. चांदूर रेल्वे पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवित अवघ्या काही तासांतच अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
चांदूर रेल्वे शहरातील आठवडी बाजाराजवळील कुंदन बूट हाऊसमध्ये चोरी झाल्याची तक्रार पंकज रूपराव नेरकर यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांत दाखल केली. त्यांच्या दुकानातून दोन हजारांचा माल चोरी गेला. सदर तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर काही वेळाने पुन्हा त्याच रात्रीदरम्यान जानवानी सिमेंट डेपो (मार्केट रोड), गणेश धान्य भांडार (आठवडी बाजार), सुपर मोबाईल शॉपी (जुना मोटार स्टँड) व रामलखन पानठेला (मांजरखेड कसबा) येथेसुद्धा चोरी झाल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. यानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवित शुक्रवारी सकाळी अवघ्या काही तासांतच यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला मांजरखेड शिवारातून ताब्यात घेतले. त्याच्याजवळून चोरी केलेले ९० हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल व सात मोबाईल बॅटरी, दोन हजार रुपयांचा माल व अंदाजे दोन हजार रुपये रोख व चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. सदर चोरीचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सहायक ठाणेदार विक्रांत पाटील हे करीत आहेत.