अमरावती : सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे ५९ गट व त्याअंतर्गत पंचायत समितींच्या ११८ गणांची प्रारूप प्रभागरचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सोमवार, दि. १४ जुलै रोजी जाहीर केली. यावेळी तब्बल १३ जि.प. गटांच्या नावात बदल झालेला आहे. प्रभागरचनेत अचलपूर तालुक्यात एका गटात वाढ व चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गटात कमी झालेली आहे.
जिल्हा परिषदेसह १४ पंचायत समित्यांवर साधारणपणे तीन वर्षापासून प्रशासकराज आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने १२ जून २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार २०११ ची जनगणना व २०१७ ची प्रभागरचना लक्षात घेऊन सदस्यसंख्या निश्चिती व प्रभागरचनेचे आदेश दिले होते. त्यानुसार २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळेस देखील जि.प.चे ५९ गट व याअंतर्गत ११८ पंचायत समितीचे गण निश्चित करण्यात आलेले आहेत. यानुसार प्रभागरचना निवडणूक यंत्रणेद्वारा प्रभागरचना करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रभागरचनेवर आता २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना जिल्हा निवडणूक विभागाकडे दाखल करण्यात येणार आहे. यावर अभिप्राय देऊन जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करतील. यावर विभागीय आयुक्तांद्वारा ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय देणार आहेत व त्यानंतर अंतिम प्रभागरचना मान्यतेसाठी १८ ऑगस्टला विभागीय आयुक्तांद्वारा राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत.
गटातील मोठ्या गावाचे नाव गट व गणालायावेळी गटनिश्चिती करताना संबंधित गटातील मोठ्या गावाचे म्हणजेच सर्वाधिक लोकसंख्येच्या गावाचे नाव त्या गटाला देण्यात आलेले आहे. हीच पद्धत पंचायत समिती गणांसाठी वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे गटांचे नाव बदलताच त्याअंतर्गत असलेल्या एका गणाचे नावातदेखील बदल झालेला आहे. अन्य गण व गट मात्र पूर्वीप्रमाणेच आहेत.
अचलपुरात एक गट वाढला चांदूररेल्वेत झाला कमीलोकसंख्येनुसार सदस्यसंख्या निश्चित करताना अचलपूर तालुक्यात धोतरखेडा हा गट वाढला व याअंतर्गत दोन गणदेखील वाढले आहेत. याच निकषानुसार चांदूररेल्वे तालुक्यातील पळसखेड गट कमी झाल्याने त्याअंतर्गत असलेले दोन गण कमी झालेले आहे. त्यामुळे गण-गटांच्या रचनेत बदल झाला.
या गटांच्या नावात बदलधारणी तालुक्यात आता बैरागड, तलई, कळमखार, टिंटबा व सावलीखेडा अशी गटांची नावे झाली आहेत. चिखलदरात चुरर्णी, काटकुंभ व जामली, चांदूरबाजारमध्ये ब्राह्मणवाडा थडी, मोर्शी तालुक्यात पिंपळखुटा मोठा, दर्यापूर तालुक्यात थिलोरी, नांदगावमध्ये फुबगाव व धामणगाव तालुक्यात चिंचोली या नावांनी गट निश्चित करण्यात आले आहेत.