फोटो पी ०६ वरूड
वरूड : शहरात दोन शासकीय, तर एक खासगी कोविड चाचणी केंद्र आणि एक लसीकरण केंद्र आहे. तालुक्यात सहा प्राथमिक स्वास्थ केंद्रात कोविड-१९ लसीकरण केंद्र आहेत. परंतु नागरिकांच्या गर्दीने त्रिसूत्रीचा फज्जा उडाला आहे. कोरोना चाचणी केंद्र आणि लसीकरण केंद्रच कोरोनाचे उगमस्थान ठरू लागले आहे. गुरुवारी वरूड येथील लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. वरूड शहर व तालुक्यातील डझनभर गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरली आहेत.
लसीकरण केंद्रावर शेकडो लोकांची लसीकरणाकरिता गर्दी वाढू लागली असून, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. वरूड शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या लसीकरण केंद्राला यात्रेचे स्वरूप आले आहे . येथे लसी ३०० आणि नागरिक हजार, अशी अवस्था आहे. टोकन घेतल्यावरही नागरिकांची झुंबड उडत आहे. हीच अवस्था मराठी शाळा आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शासकीय मोफत कोविड चाचणी केंद्राची आहे. एका खासगी कोविड चाचणी केंद्रावर १२०० रुपयांत चाचणी करून दिले जाते, तेथेही शेकडो लोकांची गर्दी असून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. हेच केंद्र कोरोना स्प्रेडर बनले असून कोविड चाचणीकरिता आलेले अनेक नागरिक पॉझिटिव्ह येत असून येथूनच कोरोनाचा प्रसार होत आहे. मात्र, यावर कुणाचाच अंकुश राहिलेला नसून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण तालुका समितीसुद्धा कुचकामी ठरत आहे.