निवडणुकीत लागणार कस : राजकीय
क्षेत्राचे वळले लक्षअमरावती : ग्रामीण भागात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षासह चार विषय समिती सभापतींचा कस लागणार असून, याकडे राजकीय क्षेत्राची लक्ष लागले आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण भागातील राजकारण शिगेला पोहोचले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. आता ग्रामपंचायतीमध्ये पॅनेलद्वारे समर्थकांना निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे .जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार विषय समिती सभापतींच्या गटातील जवळपास ६९ ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीची लढत असून, यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे राजकीय क्षेत्राची लक्ष लागून राहिले आहे.
बॉक्स
जिल्हा परिषद अध्यक्षांचा घाटलाडकी गट
घाटलाडी (ता चांदूर बाजार) गटातून बबलू देशमुख हे ४५०० मताधिक्याने निवडून जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान आहेत. आता या गटातील ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्याशिवाय जिल्हाभरातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार मार्चेबांधणी केली जात आहे.
जि.प.उपाध्यांचा सातेगाव गट
७५९० मते घेऊन सातेगाव गटातून निवडून आलेले विठ्ठलराव चव्हाण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या गटातील २१ पैकी १९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.या ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. ते यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
आरोग्य सभापतींचा पिंपळोद गट
पिंपळोद गटाचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर हे प्रतिनिधित्व करतात. ते या गटातून ११०० मतांनी विजय झाले होते. त्याच्या गटातील जवळपास १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यापैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात, याकरिता त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बॉक्स
समाजकल्याण सभापतींचा टेम्ब्रुसोंडा गट
चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा गटाचे सदस्य दयाराम काळे यांनी ४४०० मतांनी विजय मिळविला होता. ते जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आहेत. त्याच्या गटातील १२ पैकी आडनदी व बारलिंगा या ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. गटातील या ग्रामपंचायतींवर प्राबल्य काय ठेवण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे.
बॉक्स
शिक्षण सभापतींचा देवगाव गट
देवगाव ( ता. धामणगाव रेल्वे) गटाच्या सदस्य प्रियंका दगडकर यांनी केवळ ५५ मते अधिक घेऊन विजय मिळविला होता. त्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम व शिक्षण सभापती आहेत. त्यांच्या गटातील १६ पैकी १५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या गटातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम ठेवण्याचे त्यांचे लक्ष्य कितपत साध्य होते, हे औत्सुक्य आहे.
बॉक्स
महिला, बाल कल्याण सभापतींचा गट कुऱ्हा
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती तथा कुऱ्हा (ता. तिवसा) गटाच्या सदस्य पूजा आमले यांनी ३७०० मते घेऊन विजय संपादन केला होता. त्याच्या गटातील नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर सत्ता कायम मिळविण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे, मोठ्या व लहान आकाराच्या गावांचा यात समावेश असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेचे ठरणार आहे.
बाॅक्स
जि.प. गट ग्रा.पं.संख्या
घाटलाडकी ७
कुऱ्हा १६
सातेगाव २१
पिंपळोद २०
देवगाव १८
टेम्ब्रुसोंडा १२