पान ३ ची लिड
नुकसान : मुलींच्या लग्नाला जमवलेले पैसेसुद्धा जळून खाक
तळवेल : चांदूर बाजार तालुक्यातील वडुरा येथे शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास श्रीकृष्ण वाकोडे यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी श्रीकृष्ण वाकोडे व त्यांची पत्नी सकाळी दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी गेले होते, तर घरी कोणीच नव्हते.
आग लागल्याची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरल्याने गोळा झालेल्या ग्रामस्थांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बँक बंद असल्याने वाकोडे यांनी घरीच लोखंडी पिंपात ही रोकड ठेवली होती. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. श्रीकृष्ण वाकोडे हे पत्नी व मुलीसोबत राहतात. त्यांच्याकडे वडुरा येथे दोन एकर शेती आहे. स्वत:च्या शेतीसोबतच दुसऱ्याच्या शेतात राबून ते उदरनिर्वाह करतात.
शनिवारी सकाळी वाकोडे दाम्पत्य फण वेचण्याकरिता गेले होते. त्यांची मुलगी बाहेर गेली होती. त्यामुळे घराला कुलूप होते. सकाळी ११ च्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. शेजारी दिलीप ठाकरे यांच्या घराला आग लागली. त्यांचेसुद्धा नुकसान झाले, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.