अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होऊ घातली आहे. कोरोना संसर्गाच्या विळख्यामुळे प्रवेशित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयेच परीक्षा केंद्रे राहतील, असा निर्णय झाला आहे. यामुळे अमरावती विभागात पहिल्यांदाच तब्बल २८३० केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड-१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. नियमित विद्यार्थ्यांना परीक्षेत अर्धा तास व अपंग विद्यार्थ्यांना एक तास अधिक वेळ देण्यात येणार आहे.
विभागात दहावीच्या एकूण २६६८ शाळांची नोंद आहे. गतवर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ७१६ केंद्रे होती. मात्र, यंदा २५३६ परीक्षा केंद्रे असतील. १८२० केंद्रे वाढली आहेत. १३२ शाळांना विद्यार्थिसंख्या अथवा तांत्रिक कारणांनी डच्चू देण्यात आला आहे.
अमरावती विभागात बारावीसाठी एकूण १५७२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी १५१४ परीक्षा केंद्रे राहतील. ५८ कनिष्ठ महाविद्यालयांना वंचित ठेवण्यात आले आहे. गतवर्षी बारावीसाठी ५०४ केंद्रे होती. यंदा १०१० परीक्षा केंद्रे वाढली आहेत.
--------------------
विभागात असे आहेत परीक्षार्थी
दहावी : १,६४, ६३२
बारावी : १,३७, ५६९
------------------
राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू आहे. दहावीसाठी १८२०, तर बारावी परीक्षेसाठी १०१० केंद्रे वाढली आहेत. काही अपवाद वगळता प्रवेशित विद्यार्थ्यांना त्याच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
- शरद गोसावी, विभागीय अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ.