अमरावती : मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने आरटीई खासगी शाळांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन घालून देण्यात आलेले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ११ जूनपासून जिल्हाभरात १३३ विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश निश्चित झाले आहेत. ०९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश अंतिम करण्यात आले आहेत. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ याकरिता प्रवेशाची प्रक्रिया वेळेवर सुरू झाली होती. जिल्ह्यातील २३४४ शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी २,०७६ जागा उपलब्ध असून, त्यासाठी ५,९१८ अर्ज प्राप्त झाले होते. एप्रिलमध्ये सोडत काढल्यानंतर जे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले त्यांच्या पालकांना मोबाईलवर प्रवेशाचा एसएमएस प्राप्त झाला होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रवेश प्रक्रियेला ब्रेक लागला होता. कोरोनामुळे रखडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला ११ जूनपासून सुरुवात झाली. यात आरटीईचे १३३ तात्पुरते, तर ९ जणांचे अंतिम प्रवेश निश्चित झाले आहेत. दरम्यान प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये, निवड यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.