मोहाडी : स्वच्छ भारत मिशनद्वारे बाल स्वच्छता उपक्रम कालपासून राबविल्या जात आहे. हा अभियान प्रशासनाने व मूळ पातळीवर अंमलबजावणी करणाऱ्या शाळांनी गंभीरतेने घेतल्याने बऱ्याच शाळांमध्ये अध्यापन बुडणार असल्याची बाब समोर आली आहे.बाल स्वच्छता अभियान उपक्रम १४ नोव्हेंबर पासून राबविणे सुरू झाले. बाल स्वच्छता कार्यक्रमाला उसंत दिली गेली नाही. सातत्याने हा कार्यक्रम सहा दिवस चालणार आहे. या सहा दिवसात शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करायचा आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून द्यायचे आहेत. रांगोळी, निबंध, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन शाळा-शाळांमध्ये केले जाणार आहे. एकूणच सहा दिवस स्वच्छता या विषयावर पूर्ण शाळा केंद्रीत झाल्या आहेत. तसेच कोणत्या शाळा बाल स्वच्छता कार्यक्रमात गांभिर्याने सहभागी होत नाही त्यांची निगरानी विविध पथकाद्वारे होणार आहे. बालस्वच्छता हा भाग केवळ शाळांपूरता मर्यादित केला नसल्याने गावात स्वच्छतेची जागृती, समाजाचा गावातील प्रत्येक घटकांचा सहभाग करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर येवून पडली आहे. त्यामुळे एकूणच शाळा प्रमुखावर तसेच अध्यापकावर अप्रत्यक्षपणे स्वच्छता मिशनचा दडपण आलेला आहे. या स्वच्छता अभियानातून सुटण्याचा कुठेच मार्ग शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शाळा प्रमुख व शिक्षक आधी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य देवू लागली आहे. पथकाच्या निरीक्षणात कमी जास्त आढळले त्याचा ठपका आपल्या शाळेवर येवू नये यासाठी बाल स्वच्छता अभियान अतिशय काळजीपूर्वक राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबीमुळे बऱ्याच शाळांमध्ये खडू-फळा बंद राहण्याची शक्यता असल्याची प्रचिती दिसून आली. या सहा दिवसात अध्यापन निटपणे होईल याची शाश्वती अधिकारी देण्यास पुढे मागे बघत आहेत. आम्ही तरी काय सांगणार, शासनाचा उपक्रम राबविलाच पाहिजे, तुमच्या सारखीच आमची स्थिती आहे. एवढाच फरक की आम्ही अधिकारी म्हणून निरीक्षण करणार तुम्ही राबणार ही प्रतिक्रिया बालस्वच्छता अभियानात निरीक्षण पथकात असणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे.शाळांना रविवार हा दिवस सुटीचा असला तरी त्या दिवशी शाळा स्तरावर आरोग्य विभागाच्या चमूकडून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी शाळा सकाळपाळीत भरविण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री व शालेय सचिव यांनी वेगवेगळे पत्र काढले आहे. त्या पत्रात १६ नोव्हेंबरला कोणताच उपक्रम दिला नाही. त्यांनी शाळांना रविवारी सुटी असल्याची जाणिव ठेवून कोणताच शाळांसाठी कार्यक्रम ठेवला नाही. तथापि, प्रशासनाने रविवारीही शाळांच्या शिक्षकांना वेठीस पकडले आहे. रविवार असल्याने त्या दिवशी पूर्ण उपस्थित राहणार नाही जाणीव मंत्र्यांना आहे, शालेय सचिवांना आहे, मात्र प्रशासनाने अधिकचा शहणपणा केला असल्याचे दिसून येते. जे विद्यार्थी अनुपस्थित राहणार त्यांची आरोग्य तपासणी परत होणार नाही. यापूर्वीही शाळांमध्ये आरोग्य तपासणीचा कार्यक्रम झाला. या उपक्रमात विशेष काही आरोग्य तपासणी होणार आहे, असे दिसत नाही. सकाळच्या ८ ते १२ पर्यंत रविवारी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे. त्या निर्माण केलेल्या आरोग्य पथकांना आरोग्य तपासणीचा दिलेला उद्दीष्ट धावपळीतच पार पाडावा लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाल स्वच्छता अभियानात अध्यापन बुडणार
By admin | Updated: November 15, 2014 01:18 IST