अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपेक्षेपेक्षा लवकर जाहीर झाल्याने अनेक उमेदवारांची प्रचारासाठी तारांबळ उडणार आहे. २० जून रोजी मतदान होणार असून, २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे सध्या शाळेत शिक्षकच नसल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष संपर्क मोहीमच राबवावी लागणार आहे. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या संपर्क मोहिमेला वेग आला आहे. यंदा शिक्षक संघटनांसह राजकीय पक्षांनीही थेट रिंगणात उडी घेतल्याने निवडणुकीतील सामना रंगणार आहे. काही उमेदवारांनी तर दोन महिन्यांपासून मतदारांच्या भेटी घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. अनेक उमेदवारांना जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मतदान होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार अनेकांनी प्रचाराचेही नियोजन केले होते. ९ जूनपासून सिनिअर व ज्युनिअर कॉलेज सुरू होणार असून, २६ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. मात्र २० जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीतील जवळपास ६० टक्के मतदार हे हायस्कूल टिचर असल्याने त्यांच्याशी सध्या संपर्क साधणे हे उमेदवारांसमोर एक आव्हानच आहे.
** कॉर्नर मीटिंगचे आयोजन...शाळांना सुटी असल्याने हायस्कूल टिचर्सशी सहज संपर्क साधणे उमेदवारांना शक्य होत नसल्याचे पहावयास मिळत आहे. यापूर्वी उमेदवार शाळा सुरू असताना शाळेत जाऊन शिक्षकांशी संपर्क साधणे अथवा त्यांना बैठकांचा निरोप देत होते. मात्र आता शाळांना सुटी असल्याने कॉर्नर मीटिंग घेणे, गाव अथवा शहरात संपर्क यात्रा काढण्यावर उमेदवारांना भर द्यावा लागणार आहे.