आयुक्तांचा संकल्प : झोपडपट्ट्यांमधील वस्तुस्थिती घेतली जाणूनअमरावती : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु असलेल्या रमाई आवास योजनेतून पाच हजार घरकुलांची निर्मिती करुन शहर झोपडपट्टी मूक्त करणार, असा संकल्प महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शुक्रवारी सोडला. रमाई घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी संबंधिताना सूचना दिल्यात.आयुक्तांनी बडनेरा येथे झिरी प्रभागातंर्गत मिलचाळ, पाचबंगला, हरिदासपेठ व अशोकनगर आदी भागातील झोपडपट्ट्यांची पाहणी करताना रमाई आवास योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी त्यांनी अभियंत्यांना सूचना केल्यात. दरम्यान आयुक्त गुडेवार यांनी गरीब, दलितांचीे घरे पाहताना जी घरे पडकी आहेत. किमान त्यांना तरी घरकुल योजनेचा फायदा मिळावा, यासाठी अभियंत्यांनी तसा प्रस्ताव सादर करुन लाभार्थ्यांना घरकुल निर्माण करुन देण्याची तयारी दर्शविली. यावेळी सुनंदा बुरघाटे, सुधाकर रामटेके, नंदू वासनिक, विमल शामकुंवर, विनोद रंगारी, राजेश थूल आदींच्या घरांना भेटी देताना पडक्या पण जीवघेणी ठरणाऱ्या घरांमध्ये ही व्यक्ती कशी राहतात, या विचाराने ते स्तब्ध झालेत. या कुटुंबांकडे दारिद्र्य रेषेखालील दाखला नसला तरी ती विशेष बाब म्हणून त्यांना घरकुलांचा लाभ देण्याचा निर्णय त्यांनी पाहणी दरम्यान घेतला. रमाई आवास योजना ही एकमात्र अशी योजना असून यात निधीची कमतरता कधीच जाणवणार नाही. विकास कामे झाली नाही तर किमान गरीबांना घरे बांधून दिले, हे मान उंचावून सांगता आले पाहिजे, असे म्हणत आयुक्तांनी अभियंत्यांची कानउघाडणी केली. पाचबंगला परिसरातील गौतमवाडा येथील झोपडपट्टीची पाहणी करताना समस्या जाणून घेतल्या. यावेळी बसपाच्या पक्षनेत्या गुंफाबाई मेश्राम, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, विजय सदार, सहायक आयुक्त योगेश पिठे, आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी, प्रकाश विभागाचे अशोक देशमुख, शामकांत टोपरे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, उपअभियंता भाष्कर तिरपुडे, तांबेकर, पवार आदी अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी पाहणीत केवळ घरकुल योजनेचा लाभ कसा देता येईल, हेच नियोजन आखत अभियंत्यांनी प्रस्ताव सादर करुन शहरात पाच हजार घरकुलांच्या निर्मितीवर भर देण्याच्या सूचना केल्यात. (प्रतिनिधी)आदर्श संस्थेवर आयुक्त नाराजरमाई आवास योजनेतून लाभार्थ्यांना घरकूल मिळावे, यासाठी आॅनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आदर्श संस्थेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु या संस्थेच्या कारभारामुळे लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकला नाही, अशा तक्रारी आयुक्तांकडे आल्या आहेत. निधी असताना तो खर्च होत नसल्यामुळे आयुक्त आदर्श संस्थेवर प्रचंड नाराज असल्याचे दिसून आलेत. तसे त्यांनी आदर्श संस्थेचे प्रमुख ईचे यांना बोलूनदेखील दाखविले.
पाच हजार घरकुलांचे लक्ष्य
By admin | Updated: July 4, 2015 00:57 IST