अमरावती : मृग नक्षत्र सुरू होऊन महिना उलटत असताना हव्या त्या प्रमाणात वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळे राज्यातील २३४ गाव व वाड्यांमध्ये टँकरवारी सुरू आहे. सोबतच पाऊस नसल्याने राज्यातील जल प्रकल्पांमध्येदेखील केवळ २६.८५ टक्के जलसाठा आहे.
उन्हाळ्यात राज्याला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी मग टँकरवारी सुरू होते. त्यात खासगी आणि शासकीय असे दोन पठडीतील टँकर गाव-वाड्यापर्यंत पाणी घेऊन पोहोचतात. मुबलक पाण्यासाठी लोकांना हवा असतो तो दमदार पाऊस. मात्र, यंदा महिना होऊनही ‘तो ’ दमदार न बरसल्याने शेतकरी हतबल झाला असताना गावागावांना पाणीपुरवठा करणारे सिंचन प्रकल्पही कोरडे पडले आहेत. ५ जुलैच्या आकडेवारीनुसार, तूर्तास राज्यातील १०९ गावे व १२५ वाड्यांमध्ये ३६ शासकीय व ५८ खासगी अशा एकूण ९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात ठाणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये तूर्तास टँकरवारी नाही. नाशिक विभागात ५४, पुणे विभागात ८, औरंगाबाद विभागात ६, अमरावती विभागात २० व नागपूर विभागात ६ टँकर सुरू आहेत.
बॉक्स
असा आहे जलसंचय
अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३०.८७ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये २५.०६, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ३८.५३, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये २९.४५ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये २०.४६, तर पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये २५.६८ टक्के अशा एकूण ३२७६ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २६.८५ टक्के जलसंचय आहे.