महसूल प्रशासन अंधारात : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार उपोषणाला धामणगाव रेल्वे : शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते मोकळे करावे, यासाठी शासन राजस्व अभियान राबवीत आहे. मात्र, या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याकरिता तळेगाव दशासर येथील एका दाम्पत्याने एकाकी लढाईकरिता सुरूवात केली आहे़ परंतु महसूल प्रशासन या बाबीपासून अंधारात असल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा या दाम्पत्याने दिला आहे़तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेती गट क्रमांक ३३० मधून सरकारी पाणंद गेली आहे़ तरीसुध्दा प्रशासनाने या पाणंदीवर ले-आऊट मंजूर केले आहे़ सुर्वण जयंती राजस्व अभियानामार्फत शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता मिळावा ही सरकारी पाणंद मोकळी करावी, याकरिता तळेगाव दशासर येथील राजेश श्रीपाद घाटे व सुवर्णा राजेश घाटे यांनी तहसील कार्यालयाच्या चकरा मारायला सुरूवात केली आहे़ आपल्या वडिलांच्या नावाने शेती असून आपल्याला शेतात जायला सरकारी रस्ता मिळावा, अशी अपेक्षा तहसील कार्यालयात लेखी अर्जाद्वारे केली आहे. मात्र या कार्यालयातील प्रस्तुतकार उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत़ तहसीलदार घुगे यांची प्रत्यक्ष भेट घेतली तर आपल्याला यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे घुगे यांनी सांगितल्याचे घाटे यांनी निवेदनात म्हटले आहे़ मागील पाच महिन्यांपासून तहसील कार्यालयात ते केवळ चकरा मारत असून तालुका प्रशासन त्यांना न्याय न देत नसल्यामुळे ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे या घाटे दाम्पत्यांनी निवेदनात नमूद केले आहे़
तळेगावच्या दाम्पत्याचा पाणंद रस्त्यासाठी संघर्ष
By admin | Updated: August 1, 2015 01:46 IST