अमरावती : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील तहसीलदार अभिमन्यु बोधवड यांच्यावर हिंगोली पोलिसांनी आकसापोटी सीआरपीसी कलम १५६ (३) अन्वये कारवाई करुन त्यांना अटक केली. याशिवाय शासनाने कुठलीही चौकशी न करता अन्यायकारक निलंबन केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने कामबंद आंदोलन करुन बोधवड यांच्यावरील कारवाई रद्द करण्याची मागणी विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार अभिमन्यु बोधवड यांच्यावर शासन व पोलीस प्रशासनाने आकसापोटी अन्यायकारक कारवाई केल्यामुळे राज्यभरातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याविरुद्ध महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शासनाने बोधवड यांना निलंबित केले. सदर निलंबन तत्काळ रद्द करावे, आणि ते ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणी त्यांना पदस्थापना देण्यात यावी. सीआरपीसी कलम १५६ (३) मधील तरतुदींच्या अनुषंगाने शासनाने यापूर्वीही अनेक बैठकींमध्ये कोणत्याही महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांचेविरुद्ध अटकेची कारवाई होणार नाही, असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाने याबाबत स्पष्ट लेखी निर्देश सर्वगृह विभागाला द्यावेत, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी रजा आंदोलन करुन मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तमार्फत शासनाला दिले आहे.आंदोलनात संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, प्रवीण ठाकरे, अनिल भटकर, प्रदीप पवार, तेजुसिंग पवार, रवींद्र धुरजड, रवींद्र ठाकरे यांच्यासह अन्य उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांचा समावेश होता.
तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे कामबंद आंदोलन
By admin | Updated: July 24, 2014 23:38 IST