भाजयुमोची मागणी, तहसीलदारांना निवेदन, कोरोनाकाळात पालक त्रस्त
चांदूर बाजार : खासगी शाळांमार्फत पालकांना त्यांच्या पाल्याचे वार्षिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावून मनमानी करणाऱ्या शाळेविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. त्यात लॉकडाऊन, अनलॉक व पुन्हा लॉकडाऊनचे संकट नागरिकांवर ओढवले आहे. सामान्य लोकांची बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. या परिस्थितीत कुटुंबाची खळगी भरणे कठीण झाले आहे. त्यातच शाळा पूर्णपणे बंद असताना खासगी शाळांचे संचालक व शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांच्या पालकांकडे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्याकरिता तगादा लावणे सातत्याने सुरू आहे. पाल्याचे शुल्क भरणार नाही, तर त्यांना पुढील परीक्षा देता येणार नाही, अशी तंबी खासगी शाळांकडून दिली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सरकारने एकीकडे घराबाहेर निघू नका, सुरक्षित राहा, नियमांचे उल्लंघन करू नका, असे विविध निर्बंध लावले आहेत. अशात काही खाजगी शाळांचे संचालक व शिक्षक पालकांवर शुल्कासाठी जबरदस्ती करीत आहे. यामुळे पालक वर्गात असंतोष पसरला आहे. त्याअनुषंगाने भाजयुमोचे तालुका सरचिटणीस गजानन राऊत, अभिजित सूर्यवंशी, आनंद खांडेकर, आशिष कोरडे यांनी तहसीलदारांची भेट घेतली.
------