अमरावती : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात महायुतीकडे ३८ जागांची मागणी केली आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागांवर संघटनेने दावा केला असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता गजानन अमदाबादकर यांनी येथे दिली . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भस्तरीय बैठकीसाठी ते अमरावतीत आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.स्वाभीमान शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका अमदाबादकर यांनी मांडतानाच यापूर्वीच्या केंद्रातील व सध्याच्या राज्यातील शासनकर्त्यांवर ताशेरे ओढले. ते म्हणाले देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. मात्र देशात शेतकऱ्यांच्याच बाबतीत केंद्र व राज्य शासन उदासीन आहे. दरवर्षी रेल्वेसाठी स्वतंत्र बजेट सादर केले जाते. याशिवाय अर्थसंकल्प सादर करताना यामध्ये शेतीसाठी मात्र केवळ ३ टक्केच तरतुद केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. केंद्र शासनाने कृषीसाठी स्वतंत्र बजेट सादर करावे अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतमाला भाव मिळावा यादृष्टीने शेतीवर आधारीत उद्योग धंदे सुरू करावे व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीसोबत निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने महायुतीच्या नेत्यांकडे ३८ जागांचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये विदर्भातील आठ जागा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मागितल्या आहेत. विदर्भात ज्या जागांवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेने दावा सांगितला त्यात वरूड-मोर्शी, चिखली, खामगाव, कारंजा, वणी, देवळी, काटोल व बाळापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान विदर्भातील जागांबाबतचा अंतीम निर्णय संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हेच घेतील. त्यांचा निर्णय संघटनेला मंजुर राहील असेही अमदाबादकर यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, प्रफुल्ल गजबे, नारायण जांभोळे, सीताराम भुते, विनायक काकडे, कैलास फाटे, प्रवीण मोहोड उपस्थित होते. ( प्रतिनिधी )
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भात आठ जागांवर दावा
By admin | Updated: August 19, 2014 23:26 IST