अमरावती : काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या तिवसा मतदारसंघातील उमेदवार यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जंगी शक्तीप्रदर्शन केले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी तिवसा, अमरावती, मोर्शी, भातकुली तालुक्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यशोमती ठाकूर गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने तिवसा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेषत: महिलांनी सकाळी १० वाजतापासून तिवसा येथील कुऱ्हा मार्गावरील एका मंगलकार्यालयात गर्दी केली होती.यशोमतींनी केले कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन दुपारी १२ वाजतापासून येथूनच सुमारे १५ हजार कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या मतदारांमधील उत्साह पाहता यशोमती ठाकूर यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन दिग्गज नेत्यांनी केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठनेते हरिभाऊ मोहोड यांनी प्रास्ताविकातून उमेदवारीबाबतची भूमिका विशद केली. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, अमरावती बाजार समितीचे मुख्य प्रशासक मनोज देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश साबळे, प्रकाश काळबांडे, शिरीष मोहोड, माजी समाजकल्याण सभापती दिलीप काळबांडे, पं.स. सदस्य जयंत देशमुख, अनिल गंधे, तिवसा पं.स. सभापती देवीदास डेहणकर, उपसभापती भारत ढोणे, प्रतापराव भुयार, सुभाष बोंडे, तिवसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंद देशमुख, विकास इंगोले, मोर्शी तालुकाध्यक्ष प्रशांत डहाणे, शोभा झाकर्डे, जि.प. सदस्य चित्रा डहाणे, विनोद डांगे, वर्षा अहाके, सरिता मकेश्वर, प्रकाश टेकाडे, भातकुली तालुकाध्यक्ष मुकद्दर खॉ पठाण, अमरावती तालुकाध्यक्ष संदीप रिठे, तिवसा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शुभांगी उमप, तिवसा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश मोरे, तिवसा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रितेश पांडव, मार्डाचे सरपंच सुरेश धवने, रामू तांबेकर, वलगावचे सरपंच कय्युमभाई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दुपारी १ वाजता यशोमती ठाकूर यांचे तिवसा येथे आगमन झाले. त्या कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ तुफान घोषणाबाजी करुन जोरदार समर्थन दिले. नेत्यांच्या मार्गदर्शनानंतर उमेदवारी दाखल करण्यासाठी यशोमती ठाकूर या रॅलीने पोहोचल्या.तिवसा मतदारसंघात पाच वर्षांत रेकॉर्डब्रेक निधी खेचून आणला व संपूर्ण तिवसा मतदारसंघाचा विकास केला. परंतु अजूनही बराच विकास करायचा आहे आणि त्यासाठीच निवडणूक रिंगणात पुन्हा उडी घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व केलेला विकास लक्षात घेता जनता मला सहकार्य करेल, यात तीळमात्र शंका नाही. काँग्रेस पक्षाला त्याग व बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. इंदिरा गांधींपासून सोनिया गांधी या उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या महिलाच आहेत. तुमची लेकही विकासासाठी धडपड करीत आहे, हे ध्यानात ठेवा, असे भावनिक आवाहन यशोमती ठाकूर यांनी करताच उपस्थितांची उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यशोमती ठाकूर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे जंगी शक्तीप्रदर्शन
By admin | Updated: September 25, 2014 23:15 IST