अनेक दुर्धर आजार व जटील शल्यक्रिया आदींच्या उपचारासाठी वरदान ठरलेल्या विभागातील एकमेव संदर्भ सेवा रुग्णालयात अनेक शल्यचिकित्सक १२ वर्षांपासून सलग सेवा देत आहेत. कोविड-१९ च्या काळातही त्यांची सेवा अखंड सुरू आहे. मात्र २० महिन्यांपासून त्यांचा मानधनाचा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी शल्यचिकित्सकांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० मध्ये संपदेशखील पुकारला होता. त्यावेळी आरोग्य सहसंचालक मुंबई व जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडून मानधन तत्काळ अदा करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला. परंतु त्यावर कार्यवाही झालेली नव्हती. अखेर शिष्टमंडळाने आ. सुलभा खोडके यांची भेट घेऊन प्रलंबित मानधनाबाबत अवगत केले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांना वेतनवाढ मिळून सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र, रुग्णालयाचा कणा असणाऱ्या शल्यचिकित्सकांना नियमित मानधन देण्यात येत नाही, अशी कैफियत शल्यचिकित्सकांद्वारे आ. खोडके यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात आ. सुलभा खोडके यांनी सोमवार, ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावला. सुपर स्पेशॅलिटीत किडनी, हार्ट, लिव्हर यासह अनेक दुर्धर व जटील आजारांवर उपचार होत असून विभागातील पाचही जिल्ह्यांमधून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. ०१ जून रोजी ना.अजित पवार यांनी अमरावती सुपर स्पेशालिटीच्या शल्यचिकित्सकांचे २० महिन्याचे प्रलंबित वेतन अदा करण्यासाठी फंड रिलीज करण्याचे निर्देश वित्त विभागाला दिले.
सुपर स्पेशालिटीतील शल्यचिकित्सकांना मिळणार २० महिन्यांचे प्रलंबित मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST