पोलीस आयुक्तांशी चर्चा : महापालिका आयुक्तांची उपस्थितीअमरावती : शहरातील अनियंत्रित वाहतूक व्यवस्थेवर आ.सुनील देशमुख यांनी सोमवारी कमालीचा संताप व्यक्त केला. नियंत्रित वाहतुकीसाठी हातात हात घालून काम करण्याच्या सूचना महापालिका व पोलीस यंत्रणेला दिल्यात. यावेळी जड वाहतुकीच्या मुद्यावर देशमुख यांनी पोलीस विभागाला धारेवर धरले. सोमवारी आ.सुनील देशमुखांनी पोलीस आयुक्तांशी याविषयावर चर्चा केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार उपस्थित होते. शहरातील ठिकठिकाणी अवैध पार्कीग व अस्ताव्यस्त वाहतूकीचे चित्र पाहता सोमवारी आ.सुनील देशमुखांनी आक्रमक भूमिका घेऊन महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी राजापेठ ते गांधी चौकदरम्यानच्या मार्गावर जड वाहतुकीमुळे एका विद्यार्थींनीचा अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्पूरती अधिसूचना काढली होती. मात्र, त्या अधिसूचनेची अमंलबजावणी होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच शहरात वाहतुकीचा हॉकर्स झोनचा मुद्दासुद्धा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पोलीस आयुक्तांच्या कक्षात पार पडलेल्या या बैठकीत अधिसूचनेचा मुद्दा गाजला. शहरातील बहुतांश मार्गावर पार्किंगचा सावळा गोंधळ सुरू आहे. व्यापारी संकुलांनी पार्किंग गिळंकृत केली, हे माहित असतानाही त्याच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याची बाब देशमुख यांनी उभय आयुक्तांच्या लक्षात आणून दिली.'लोकमत' घेऊन पोहोचले आमदारशहरातील अनियंत्रित वाहतूक समस्यांचे वास्तव 'लोकमत'ने लोकदरबारात मांडले. या समस्येचा सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी आ. सुनील देशमुख यांनी लोकमत घेऊन पोलीस आयुक्तांचा कक्ष गाठला. पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांसमक्ष 'लोकमत' ठेवून त्यांनी जाब विचारला. पंचवटी चौक व रघुवीर हॉटेलसमोरील पार्किंग व बेलगाम वाहतुकीच्या मुद्यालाही देशमुख यांनी हात घातला. देशमुख यावेळी चांगलेच संतापले होते.आ.देशमुख व महापालिका आयुक्तांशी अधिसूचनेबाबत चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने विविध संघटना व नागरिकांचा आक्षेप नोंदवून पालकमंत्री प्रवीण पोटे व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याशी चर्चा करून दिशा ठरविण्यात येईल.- दत्तात्रेय मंडलिक, पोलीस आयुक्त जड वाहतुकीची अधिसूचना आणि अनियंत्रित वाहतुकीसंदर्भात उभय आयुक्तांसोबत बैठक घेतली. हॉकर्स झोन व जड वाहतुकीचा मुद्दा निकाली काढण्याचे निर्देश दिलेत. - सुनील देशमुख, आमदार, अमरावती मतदारसंघ
अनियंत्रित वाहतुकीवर सुनील देशमुख आक्रमक
By admin | Updated: June 28, 2016 00:04 IST