पारा ३७ अंशावर : उकाड्यामुळे नागरिक हैराण अमरावती : भर पावसाळ्यात उन्हाळ्यातील उन्हाचे चटके अमरावतीकरांना सोसावे लागत आहेत. मंगळवारी ३७.८ डिग्री तापमानाची नोंद झाली असून उन्हाच्या तडाख्याने निर्माण झालेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यंदा उन्हाळ्यातील तापमान ४९ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले होते. साधारणत: ३५ डिग्री सेल्सीअसपर्यंत तापमान पोहोचल्यास उन्हाच्या झळा जाणवायला लागतात. जीवाची लाही लाही होणे सुरु होते. उन्हाळ्यात दरवर्षीच असे वातावरण असते. त्यामुळेच लोकांना पावसाळ्याची प्रतीक्षा असते. परंतु यंदाअमरावतीकर नागरिक भर पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. सुरूवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावले होते. मात्र, २२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरण पुरते पालटले आहे. आठवडाभरापासून ३४ ते ३७ डिग्री तापमानाची नोंद केली जात आहे. मंगळवारी सर्वाधिक ३७.८ डिग्री सेल्सीअस तापमान नोंदविले गेले. एलनिनो व महावादळामुळे मान्सून स्थिती बदलली आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. स्थानिक परिस्थितीवरून १८ व १९ जुलै रोजी विदर्भातील तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. - अनिल बंड,हवामान तज्ज्ञ,
भर पावसाळ्यात उन्हाळ्याचे चटके
By admin | Updated: July 16, 2015 00:26 IST