राजुरा बाजार : पीक विम्याच्या नावावर विमा कंपन्या शेतकऱ्याचा प्रीमियम घेऊन मोबदल्यात अल्पशी मदत देऊन त्यांची बोळवण करीत असल्याची ओरड आहे. अतिपाऊस व त्यानंतर अकाली व सततच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली नाही.
-------------
नांदगावपेठ -पांढुर्णा महामार्गाला भेगा !
मोर्शी : नांदगाव पेठ ते पांढुर्णापर्यंत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला अवघ्या दीड ते दोन वर्षांतच अनेक ठिकाणी भेगा पडल्या. या नवीन महामार्गावरील सिमेंट रोडवर पडलेल्या भेगा मोठ्या असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
--------------
पंचवटीच्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमण
अमरावती : पंचवटी चौकातील उड्डाणपूल परिसरात पुन्हा हातगाडीधारकांचे अतिक्रमण झाले आहे. लॉकडाऊन काळात ते अतिक्रमण दूर सारले गेले होते. मात्र, आता पुन्हा सायंकाळी त्या भागात अनेक हातगाड्या लागत आहेत. त्याकडे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष आहे.
--------------
कॉलेज रोडवर चप्पल, बुट विक्रीचा बाजार
अमरावती : शिवाजी कॉलेज, गणेशदास राठी विद्यालय या दोन्ही शाळा महाविद्यालयासमोरच्या पदपथावर पादत्राणे विक्रीचा बाजार बिनबोभाटपणे भरविला जात आहे. अगदी सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे अतिक्रमण थाटण्यात येत आहे. महापालिकेने ते अद्यापही दूर सारलेले नाही.
---------------
राजकमल चौकात अपघाताचे प्रमाण वाढले
अमरावती : जयस्तंभ चौकाकडून पुढे राजकमल चौकाकडे जाणारा मार्ग एकाच दिशेने बनल्याने या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. राजलक्ष्मी टॉकीजच्या बाजुने रस्ता बांधकाम झाल्याने ती बाजू तुलनेत वर आली. त्यामुळे वाहने घसरून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
-----------------------
रेल्वे गेट परिसराला अतिक्रमणाचा विळखा
चांदूर रेल्वे : येथील रेल्वेगेटसमोर दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुकानेही रोडला एक फूट लागूनच असून एका दुकानापासून सुरुवात होऊन आता १२ ते १४ दुकाने झालेली आहे. रस्त्याच्या आजूबाजूला सोनगाव व सावंगा पुनर्वसन हे गाव आहे. दुकानामुळे रोडच्या बाजूलाच वाहने उभी राहतात. त्यामुळे सदर दुकाने हटविण्यात यावे, अशी मागणी आहे.
---------------
धारणीतील कोल्हापुरी बंधारा भरला
धारणी : येथून सात किलोमीटर अंतरावरील रोहनीखेडा या गावाजवळून वाहणाऱ्या गडगा नदीच्या पात्रात कोल्हापूरी बंधारा बांधण्यात आला आहे. दरवर्षी या बंधाऱ्यातील पाणी दिवाळीनंतर अडविण्यात येते. त्यामुळे या भरलेल्या बंधाऱ्यातील पाणी जवळपासच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहे.
---------
बहिरमबाबाचे मुखदर्शन
ब्राम्हणवाडा थडी : यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश न देता भाविकांना बहिरमबाबाचे मुखदर्शन घेता येणे शक्य आहे. मूर्तीला हात लागू नये, यासाठी गाभाऱ्यातील प्रवेश वर्जित करण्यात आला. मंदिर प्रशासनाने कठडे उभारलेले आहे. तसेच मंदिरात शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पूर्ण पालन केले जात आहे.
--------