अमरावती : विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आ. श्रीकांत देशपांडे व आ. दत्तात्रय सावंत यांनी मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर १८ आॅक्टोबर रोजी सांगता करण्यात आली. आ. श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत या आमदारद्वयांनी वारंवार शिक्षण मंत्र्यांची तसेच शिक्षण सचिवांची भेट देऊन विनावेतन अध्यापन करणाऱ्या विनाअनुदानित शाळांतील कार्यरत हजारो शिक्षकांना वेतन अनुदान देण्याची विनंती केली होती. याशिवाय इतर मागण्याही त्यांनी शिक्षण सचिवांपुढे मांडल्या होत्या. शिक्षकांना वेतन अनुदान मिळण्यासाठी वारंवार मागण्यांचा पाठपुरावा केला. मात्र, तरीही राज्यातील सुमारे २० हजार शिक्षकांना प्रत्यक्ष अनुदान देय ठरविले गेले नाही. यामुळेच या दोन्ही आमदारांनी उपोषण आरंभले होते. उपोषणाला शिक्षक सेनेचा पाठिंबा मिळाला आहे. शिक्षक सेनेचे पदाधिकारी ज.मो.अभ्यंकर उपोषणस्थळी उपस्थित होते. उपोषणमंडपाला गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी देखील भेट देऊन चर्चा केली होती. अखेर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आमदारद्वयांशी दूरध्वनीवरून चर्चा करून अपंग समावेशित शिक्षण व्यवस्थेतील शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षण देण्याचे मान्य केले. तसेच १९ सप्टेंबर २०१६ रोजीच्या आदेशातील सर्व जाचक अटी दूर करीत असल्याचे व अपंग समावेशित शिक्षकांचे समायोजन करीत असल्याचे आश्वासनही दिले. या आश्वासनानंतर आ. श्रीकांत देशपांडे यांनी उपोषणाची सांगता केली. (प्रतिनिधी)
श्रीकांत देशपांडेंच्या उपोषणाची यशस्वी सांगता
By admin | Updated: October 22, 2016 00:07 IST