अभाविपची कुलगुरुंसोबत भेट : दिरंगाईबद्दल प्रशासनाने घेतली नरमाईची भूमिकाअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी कुलगुरुंची भेट घेऊन ४५ दिवसांच्या आत निकाल का लागले नाही? याबाबत जाब विचारला. अखेर कुलगुरुंनी निकाल उशिरा लागण्याची कारणमिमांसा स्पष्ट करुन विद्यार्थ्यांची समजूत काढली.विद्यापीठाने यावर्षीपासून आॅनलाईन निकाल ही प्रणाली लागू केली आहे. अतिशय जलद गतीने निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र नवतंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यापीठ प्रशासनाच्या काही तांत्रिक चुका राहून गेल्या आहेत. त्यामुळे हिवाळी परीक्षेच्या अनेक विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. निकाल वेळेवर लागणार असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. मात्र हा दावा फोल ठरल्याने अभाविपने बुधवारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांची भेट घेवून निकाल उशिरा लागण्यामागील कारणे जाणून घेतली. यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री विक्रमजीत कलाने, जिल्हा संयोजक अखिलेश भारतीय, सहसंयोजक अभिलाष खारोडे आदींनी कुलगुरुंवर प्रश्नांचा भडीमार केला. २९ मार्च २०१६ रोजी अभाविपने विद्यापीठाशी संंबंधित ५८ मागण्यांबाबत धडक मोर्चा काढल्याची माहिती कुलगुरुंच्या पुढ्यात ठेवली. कुलगुरुंनी नुकतेच पदभार स्वीकारल्याने परीक्षा विभागाच माहिती घेऊ द्या, असे सांगितले होते. मात्र वर्षभराच्या कालावधी नंतरही निकाल उशिरा लागत असेल तर विद्यापीठाचा एवढा मोठा पसारा कशाला हवा, असा सवाल विद्यार्थी संघटनेने कुलगुरुंना विचारला. ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून अभियांत्रिकी आणि अन्य काही शाखांचे निकाल लावण्यात आले नाही. वेळेवर निकाल लागत नसल्याने उन्हाळी २०१७ आणि बॅकलॉग पेपरचा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही, अशी कैफियत विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या समोर मांडली. अभियांत्रिकी, विधीसह अन्य शाखांचे निकाल ७ दिवसांच्या आत लावण्यात आले नाही तर अभाविप तिवम आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला आहे. अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक अजुनही जाहीर करण्यात आले नाही. या परीक्षा मेपर्यत संपल्या नाही तर निकाल हे जूनपर्यत लागतील. निकाल उशिरा लागत असल्याने स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. यावेळी विक्की पांडे, ज्ञानेश्वर खुपसे, सौरभ लांडगे, श्रीरंग देशमुख, अभय सूर्यवंशी, शास्वत वार्इंदेशकर, मंदार नानोटी, शंतनू भारतीय, संदीप चव्हाण, मनोज साबळे, सारंग झंवर, प्रसन्न कोशेट्टीवार, आकाश येवले, वैभव शिलणकर, सारैभ आगासे आदी उपस्थित होते.
उशिरा निकालाबाबत विद्यार्थ्यांत संताप
By admin | Updated: March 10, 2017 00:28 IST