शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : शाळा बंद, शिक्षक संघटना आक्रमकअमरावती : औरंगाबाद येथे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी कायम विनाअनुदानित शाळा शिक्षकांनी २० टक्के अनुदानाचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात हिंसक वळण आले. शिक्षकांवर लाठीहल्ला करण्यात आला. खुनाचा प्रयत्न आणि दंगलीसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राज्यभरात शाळा बंदची हाक देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातही शाळा बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदविला.मुख्याध्यापक शिक्षक संघ, संस्था चालक संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, मुस्लिम टीचर्स असोशिएनसह सर्व शिक्षक संघटनांच पदाधिकाऱ्यांनी शाळा बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. येथील शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या मांडून शिक्षकांनी औरंगाबाद येथील लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यानंतर शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांना शिक्षकांवर झालेल्या अन्यायाचे निवेदन सादर करण्यात आले. औरंगाबाद येथे शांततेत मोर्चा सुरू असताना अचानक पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे शिक्षकांना सळो की पळो करून सोडले, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. हत्येचा प्रयत्न, दंगलीसारखे गुन्हे दाखल करण्यात आले असून जामीन न मिळाल्याने बहुतांश शिक्षकांची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मागण्या तर सोडविल्याच नाहीत, उलट शिक्षकांवर अन्यायकारक गुन्हे दाखल करण्यातच राज्य शासनाने धन्यता मानली, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला. शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शेखर भोयर, दिलीप कडू, रवींद्र कोकाटे, मेघनाथ कोरडे, संगीता शिंदे, राजिक पठाण, गाजी जहरोश, मनोज कडू, प्रदीप नानोटी, रजनी आमले, प्रवीण दिवे, शरद तिरमारे, अशोक चोपडे, खालीक चौधरी, वकील दानिश, टवलारकर गुरुजी, अशोक नाखले, गजानन वानखडे, एस. ए. डहाके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)- हा तर शासनाचा अतिरेक - संजय खोडकेकायम अनुदानित शाळांचे शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक जीआर रद्द करण्यासाठी औरंगाबाद येथे काढलेल्या मोर्चात शिक्षकांवरील अमानुष लाठीहल्ला हा प्रकार शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच घडला. राज्य शासन एवढ्यावरच थांबले नाही तर शिक्षकांवर खुनाचा प्रयत्न, दंगलीसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शासनाने शिक्षकांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे यापुढे त्यांनी आंदोलन करुच नये, हा इशारा दिला आहे. शिक्षकांवर झालेला अन्याय हा शासनाचा अतिरेक असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केला आहे.शिक्षकांनी हक्क मागू नये का? - शेखर भोयरशिक्षकांनी सनदशीर मार्गाने मोर्चा काढून मागण्या शासनापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांनी केवळ घोषणाबाजी केली म्हणून पोलिसांनी लाठी हल्ला केला. घोषणाबाजी व्यतिरिक्त कुठलेही गैरकृत्य केले नाही. मग शिक्षकांवर गुन्हे का नोंदविले. शिक्षक १५ वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन पाळावे, या मागणीसाठी तो मोर्चा काढला होता. परंतु वेतन तर दूरच कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यासाठी शिक्षकांना आता बाध्य केले आहे. त्यामुळे शिक्षकांनी हक्क मागू नये का, असा सवाल शिक्षक महासंघाने संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केला आहे.
शिक्षकांवरील लाठीमाराचा निषेध
By admin | Updated: October 7, 2016 00:28 IST