अमरावती : वीज वितरणात होणारी वाणिज्यिक हानी कमी करणे, वसुलीची कार्यक्षमता वाढविणे, वीजचोरी रोखणे तसेच भारनियमन कमी करून ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी वीज कंपनीतर्फे आता फिडर व्यवस्थापक योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत बेरोजगार विद्युत अभियंत्यांसह महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त अभियंत्याची फिडर व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ज्या भागात विजेची गळती, वीज चोरी, थकबाकी अधिक त्या भागात वीज कंपनीने मध्यंतरी ग्रुपनिहाय भारनियमन सुरू केले होते. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नसल्यामुळे कंपनीने आता सर्वाधिक भारनियमन असलेल्या ई-एफ आणि जी ग्रुपमध्ये फिडर व्यवस्थापक योजना प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात लवकरच ही योजना कार्यान्वित होणार आहे. योजनेंतर्गत फिडरनिहाय स्वतंत्र खासगी व्यवस्थापक नियुक्त करून त्या माध्यमातून वीज बिल वसुली करणे, वीज चोरी रोखण्यासह तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. वीज कंपनीतर्फे नेमले जाणारे व्यवस्थापक कंपनीला रोहीत्र लघुदाब वाहिनीची माहिती देतील.मीटर वाचनाची कामे मुदतीत करणे, वीज बिले वितरित करून वीज बिलाविषयी प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करणे, सदोष मीटर व वायर बदलविणारी अर्थिंग करणे, ई मेन्टेनन्स करणे आदी कामे व्यवस्थापकामार्फत करण्यात येणार आहेत. व्यवस्थापक ग्राहक व वीज कंपनीमधील दुवा म्हणून काम करतील. या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)
वीजचोरी रोखण्यासाठी फिडर व्यवस्थापक नेमणार
By admin | Updated: August 5, 2015 00:35 IST