अमरावती : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ शनिवारी येथील राजकमल चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जिल्हा काऊन्सील डावी आघाडी व सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने अर्धातास रास्ता रोको आंदोलन करुन शासनाविरोधात घोषणाबाजी करुन आपला संताप व्यक्त केला. दरम्यान या आंदोलनानंतर राजकमल चौकात कामगार नेते पी.बी. उके यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यामध्ये जिजाऊ ब्रिगेड, भाकप, माकप, रिपाई, क्रांति ज्योती ब्रिगेड अशा संघटनांनी सहभाग घेतला होता. कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील झालेला हल्ला हा अत्यंत निंदनिय असून पुरोगामी महाराष्ट्रात दाभोळकरानंतर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पानसरेवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध सर्वत्र व्यक्त होत असतांना हल्लेखोरांचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी अर्धातास रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली. यावेळी सहभागी आंदोलकांनी राज्य व केंद्र शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करुन या प्रकाराला आपला संताप व्यक्त केला. यानंतर राजकमल चौकात गोविंद पानसरे यांच्या निधनानिमित्त शोकसभा घेण्यात आली. या शोक सभेला पी.बी. उके, प्राचार्य रमेश अंधारे, श्रीकृष्ण माहोरे, वर्षा पागोटे, ज्ञानेश्वर जुनघरे, व्ही.एन. देवीकर, रिपाईचे हिम्मत ढोले, सुनील देशमुख, प्रकाश पांडे, माकपचे सुभाष पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप राऊत, जिजाऊ ब्रिगेडच्या मयूरा देशमुख, बी.के जाधव, नंदू नेतनवार, माधव गारपवार, सुनील घटाळे, बबन इंगोले, रुपेश फसाटे आदिंनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी माकप व भाकपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिजाऊ बिग्रेडतर्फे पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा जिजाऊ बिग्रेडने तीव्र निषेध केला. याविरोधात शनिवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सोपवून या घटनेतील हल्लेखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. कॉम्रेड नेते गोविंद पानसरे यांनी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा घेऊन समाजप्रबोधनासाठी लढत होते.त्याची हत्या म्हणजे पुरोगामी विचारावर केलेला भ्याड हल्ला होय. महाराष्ट्राच्या भूमित रूजलेल्या विवेकवादी विचाराच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केले त्या हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करावी आणि या घटनेमागील सुत्रधारांनाही अटक करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष मयुरा देशमुख,विभागीय अध्यक्ष किर्तीमाला चौधरी,कार्याध्यक्ष प्रभा आवारे, उपाध्यक्ष सुनंदा खरड, जिल्हाध्यक्ष कांचन उल्हे, सदस्य सरोज कुंटेवार, मनाली तायडे, शीला पाटील,शोभना देशमुख आदीची उपस्थिती होती.
राजकमल चौकात रास्ता रोको आंदोलन
By admin | Updated: February 22, 2015 00:06 IST