भटवाडीतील घटना : पती अटकेतअमरावती : झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यावर दगडाने हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न पतीने केला. ही घटना मंगळवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास शिवशक्ती नगराजवळील भटवाडीत घडली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी पती राजेंद्र हरिभाऊ चोरपगार (४५, रा. पंचशीलनगर) याला अटक केली आहे. जखमी रंजना राजेंद्र चोरपगार (४०, रा. भटवाडी) यांना इर्विनमध्ये दाखल केले आहे. चोरपगार दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी आहे. मंगळवारी रात्री रंजना व त्यांची मुलगी पूजा हे दोघेही घराच्या वऱ्हांड्यात झोपले होते. तर त्यांची दोन मुले मित्रांच्या घरी झोपायला गेले होते. दरम्यान, मध्यरात्री राजेंद्र हा रंजनाच्या भटवाडीतील निवासस्थानी गेला व त्याने घराच्या आवारातील दगड उचलून झोपलेल्या रंजनाच्या डोक्यावर टाकला. त्यामुळे रंजना जवळच झोपलेली पूजाने आरडाओरड करू लागल्यावर राजेंद्रने पळ काढला. पूजाने तत्काळ आपल्या भावाना बोलाविण्यासाठी धाव घेतली. पूजाच्या दोन्ही भावांनी रंजना यांना तत्काळ इर्विन रुग्णालयात आणले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.विभक्त राहणाऱ्या पतीने मध्यरात्री पत्नीचे घर गाठले व तिची दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिरीष मानकर, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.
दगडाने ठेचून पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 01:42 IST